No edit permissions for मराठी

TEXT 11

yad akṣaraṁ veda-vido vadanti
viśanti yad yatayo vīta-rāgāḥ
yad icchanto brahma-caryaṁ caranti
tat te padaṁ saṅgraheṇa pravakṣye

यत्-जे; अक्षरम्-ॐकार; वेद-विदः-वेदवेत्ते; वदन्ति-म्हणतात; विशन्ति-प्रवेश करतात; यत्-ज्यामध्ये; यतयः-महर्षी; वीत-रागाः-संन्यासाश्रमामध्ये; यत्—जे; इच्छन्तः-इच्छा करणारे; ब्रह्मचर्यम्-ब्रह्मचर्य; चरन्ति-आचरण करतात; तत्-ते; ते-तुला; पदम्-पद किंवा स्थिती; सड्ग्रहेण-सारांशरूपामध्ये; प्रवक्ष्ये-मी सांगतो.

जे ॐकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे, ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षष्ट्चक्रयोगाच्या अंभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो. षट्चक्रयोगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात. भगवंत सांगतात की, ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात. विशेषकरून निर्विशेषवादी लोकांसाठी ॐकार म्हणजेच ब्रह्म असते. या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे, ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात, वर्णन करीत आहेत.

          वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ॐकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरूबरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकविले जाते. या प्रकारे त्याला ब्रह्माच्या दोन रूपांची अनुभूती होते. विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते; परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की, विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रांकरिता अनेक संस्था आहेत; परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यताप्राप्त संस्था नाही. ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की, कलियुगासाठी भगवत्साक्षात्काराचा शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे—हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। कीर्तन होय आणि या कीर्तनाव्यतिरित कलियुगामध्ये भगवत्प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही.

« Previous Next »