TEXT 10
prayāṇa-kāle manasācalena
bhaktyā yukto yoga-balena caiva
bhruvor madhye prāṇam āveśya samyak
sa taṁ paraṁ puruṣam upaiti divyam
प्रयाण-काले-अंतकाळी; मनसा-मनाने; अचलेन-मन विचलित होऊ न देता; भक्त्या-पूर्ण भक्तिभावाने; युक्त:- युक्त; योग-बलेन-योगाच्या सामथ्र्याने; च-सुद्धा; एव-निश्चितच; भुवो:-दोन्ही भुवया; मध्ये-मध्ये; प्राणम्-प्राणवायू; आवेश्य-स्थापित किंवा स्थिर करून; सम्यक्-पूर्णपणे; सः-तो; तम्--त्या; परम्-दिव्य किंवा परम; पुरुषम्-भगवंत; उपैति - प्राप्त करतो; दिव्यम्-दिव्य आध्यात्मिक जगतामध्ये.
जो मनुष्य, अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योगसामथ्र्याद्वारे अविचलित मनाने, पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत्-स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते.
तात्पर्य: या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठायी एकाग्र करणे आवश्यक आहे. जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये (आज्ञा-चक्रामध्ये) स्थिर करण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी षष्ट्र-चक्र-योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे. षट्चक्रयोगामध्ये सहा चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते. विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही. परंतु सदैव कृष्णभावनेमध्ये युक्त असल्यामुळे, भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते.चौदाव्या शलोकात याचे वर्णन करण्यात आले आहे.
या श्लोकामधील योगबलेन या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे, कारण योगाभ्यासाशिवाय, मग तो षट्चक्रयोग असो अथवा भक्तियोग असो, मनुष्याला अंतकाळी दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानकच मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण या होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योगपद्धतीचे, विशेषकरून भक्तियोगाचे आचरण हे केलेच पाहिजे. मृत्यूसमयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्याकारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.