TEXT 19
bhūta-grāmaḥ sa evāyaṁ
bhūtvā bhūtvā pralīyate
rātry-āgame ’vaśaḥ pārtha
prabhavaty ahar-āgame
भूत-ग्रामः-सर्वं जीवांचा समूह; सः-हे; एव-निश्चितच; अयम्-हा; भूत्वा भूत्वा-पुनः पुन्हा; प्रलीयते-लय केला जातो;रात्रि-रात्रीच्या;आगमे-प्रारंभ झाल्यावर; अवश:-आपोआप; पार्थ-हे पार्थ; प्रभवति-व्यक्त होतो; अह:-दिवसाचा; आगमे-प्रारंभ झाल्यावर.
पुनः पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो.
तात्पर्य: या भौतिक जगतातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक, उच्चतर लोकाप्रत उन्नत होऊ शकतात; परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवसकाळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकांत आपली कार्ये करू शकतात; त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्रसमयी त्यांना शरीरे नसतात. त्या वेळी ते श्रीविष्णूंच्या देहामध्ये राहतात. नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. भूत्वा भूत्वा प्रलीयते-दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस, जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षांसाठी अव्यक्त स्थितीत राहतात. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात. परंतु कृष्णभावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवद्भक्तीमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्यजीवनाचा पुरेपूर लाभ घेतात, याप्रमाणे या जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्णलोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे तेथे ते नित्य आनंदातच राहतात.