TEXT 22
puruṣaḥ sa paraḥ pārtha
bhaktyā labhyas tv ananyayā
yasyāntaḥ-sthāni bhūtāni
yena sarvam idaṁ tatam
पुरुषः-परमपुरुष; स:-तो; परः-ज्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही; पार्थ-हे पार्था; भक्त्या-भक्तीद्वारे; लभ्यः-प्राप्त होऊ शकतो; तु-परंतु; अनन्यया-अनन्य, विशुद्ध किंवा अविचलित; यस्य-ज्यांच्या; अन्त:-स्थानि-अंतरात; भूतानि-या सर्व भौतिक सृष्टीच्या; येन-ज्याने; सर्वम्- सर्व ; इदम्-आपण जे काही पाहतो; ततम्-व्यापले आहे.
सर्वाहून श्रेष्ठ असणा-या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे.
तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परमलक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णांचे धाम होय. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय-रस असे करते, अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वत: भगवंतांचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास, भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहेत. यस्यान्तःस्थानि अर्थात, आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे.
भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शविल्याप्रमाणे असंख्य वैकुंठलोकांतील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदांमध्येही (गोपाल-तापनी-उपनिषद् ३.२) भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे. एको वशी सर्वांग: कृष्ण. त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत. ते परमकृपामूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षावधी विभूतींमध्ये स्वत:ला विस्तारित केले आहे. वेदांमध्ये भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले आणि पाने असणा-या वृक्षाशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावर आधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, हृषीकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी.
ब्रह्मसंहितेतही (५.३७) सांगण्यात आले आहे की, भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे. (गोलोक एव निवसत्यख्रिलात्मभूतः) वेदांमध्ये (श्वेताश्वतरोपनिषद् ६.८) सांगितल्याप्रमाणे परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते । स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च- त्याच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की, ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात.