No edit permissions for मराठी

TEXT 23

yatra kāle tv anāvṛttim
āvṛttiṁ caiva yoginaḥ
prayātā yānti taṁ kālaṁ
vakṣyāmi bharatarṣabha

यत्र-ज्या; काले-काळी; तु-आणि; अनावृत्तिम्-न परतणे; आवृत्तिम्-परत येणे; -सुद्धा; एव-निश्चितच; योगिनः—विविध प्रकारचे योगिजन; प्रयाताः-प्रयाण केलेले; यान्ति— प्राप्त होतात; तम्-त्या; कालम्-काळी; वक्ष्यामि-मी वर्णन करतो; भरत-ऋषभ-हे भरतश्रेष्ठा.

हे भरतश्रेष्ठा! आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता, तो परतून येतो अथवा येत नाही, याचे मी तुला वर्णन करतो.

तात्पर्य: जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवद्भक्त असतात ते, आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाहीत. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवद्धामात परत जातात; परंतु जे साक्षात्कारप्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यूंनी भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते.

          जर योगी सिद्ध असेल तर, भौतिक जगाचा त्याग करण्याकरिता तो स्थळकाळाची निवड करू शकतो, परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश, योगायोगाने विशिष्ट, योग्य काळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काळी मनुष्यांचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार 'काळ' हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे.

« Previous Next »