TEXT 17
pitāham asya jagato
mātā dhātā pitāmahaḥ
vedyaṁ pavitram oṁ-kāra
ṛk sāma yajur eva ca
पिता-पिता; अहम्-मी; अस्य-या; जगतः-जगताचा; माता-माता; धाता-धारण, पोषणकर्ता; पितामहः-पितामह; वेद्यम्—जाणण्यायोग्य किंवा ज्ञेय; पवित्रम्-पवित्र, शुद्ध; ॐकार-ॐकार; ऋक्-ऋग्वेद; साम-सामवेद: यजुः-यजुर्वेद;एव-निश्चितच; च-आणि.
मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धिकर्ता आणि ॐकार आहे. तसेच, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.
तात्पर्यः संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगतात श्रीकृष्णांची तटस्था शक्ती असणा-या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काहीजण आपल्याला आपले माता, पिता पितामह, पोषणकर्ता इत्यादी आहेत असे वाटते; परंतु वस्तुतः ते श्रीकृष्णांचे अंश असतात. म्हणून आपल्या माता-पित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत. या श्लोकातील 'धाता' शब्दाचा अर्थ सृष्टिकर्ता असा आहे. केवळ आपले माता पिताच श्रीकृष्णाचे अंश आहेत असे नाही, तर धारणकर्ता पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. वस्तुतः सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत. म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे. वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमश: प्राप्ती करून घेणे होय. ज्यायोगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेषकरून श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे वैदिक तत्त्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहेत. सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ॐकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्णप्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारी वेदांमधील सर्व मंत्रांत प्रणव किंवा अॅंकार हा प्रमुख आहे. म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहेत.