No edit permissions for मराठी

TEXT 3

aśraddadhānāḥ puruṣā
dharmasyāsya paran-tapa
aprāpya māṁ nivartante
mṛtyu-saṁsāra-vartmani

अश्रद्दधानाः-श्रद्धाहीन; पुरुषाः-पुरुष; धर्मस्य-धर्ममार्गावर; अस्य-या; परन्तप-हे शत्रूचा नाश करणारा; अप्राप्य-प्राप्त न होता; माम्-मला; निवर्तन्ते-परत येतात; मृत्यु-मृत्यूच्या; संसार-भौतिक जगतात; वर्त्मनि-मार्गावर,

हे परंतप अर्जुना! ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म-मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते.

तात्पर्य: अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्ग साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते डळमळीत वृत्तींचे असतात आणि भगवद्भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत. म्हणून कृष्णभावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की, भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. श्रीमद्भागवतात (४.३१.१४) सांगितल्याप्रमाणे:

यथा तरोर्मूलनिषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंधभुजोपशाखा:।
प्राणोपहाराच्च येथेन्द्रियाणां तथैव सर्वार्हणमच्युतेज्या।।

          ‘‘वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने, वृक्षाच्या शाखा, डहाळ्या, पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरविल्याने शरीराची सारी इंद्रिये तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात.’’ म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की, मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जीवनाच्या या तत्त्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय.

          या श्रद्धेचा विकास करणे म्हणजेच कृष्णभावनेची पद्धती होय. कृष्णभावनाभावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत. ज्यांना श्रद्धा नाही ते तिस-या श्रेणीमधील लोक होत. वरकरणी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत. कालांतराने ते भक्तिमार्गापासून पतित होतात. असे लोक भक्ती करतील; परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्णभावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते. आमचे प्रचारकार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की, काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्णभावनेमध्ये येतात, पण आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात, तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवनपद्धतीकडे वळतात. केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्णभावनेमध्ये प्रगती करू शकतो. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास, भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी 'दृढ निष्ठा' स्तराची प्राप्ती केली आहे, ते कृष्णभावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत. जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत; परंतु ज्यांच्या ठायी आपोआपच दृढ विश्वास आहे की, कृष्णभक्ती किंवा कृष्णसेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीतील लोक होत. अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्णभावनेचा स्वीकार करतात. याप्रमाणे, शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. कृष्णभावनेमधील तिस-या श्रेणीच्या मनुष्यांचे पतन होऊ शकते, परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो. प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभीष्टसिद्धी प्राप्त होते. कृष्णभावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्यांचा विचार केल्यास, जरी त्याला विश्वास असला की, कृष्णभक्ती शुभकारक आहे, तरीही श्रीमद्भागवत आणि भगवद्गीतेसारख्या शास्त्रांमधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते. काही वेळा कृष्णभावनेतील या तृतीय श्रेणींच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधी कधी विचलित असतात. परंतु जेव्हा कर्मयोग किंवा ज्ञानयोगाचा संसर्ग नष्ट होतो तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील क़ृष्णभावनाभावित मनुश्य होतात. श्रीकृष्णांवरील श्रद्धेच्याही तीन श्रेणी आहेत आणि त्यांचे वर्णन श्रीमद्भागवतात करण्यात आले आहे. श्रीमद्भागवतातील अकराव्या स्कंधामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणींच्या आसक्तींचे वर्णन करण्यात आले आहे. भक्तीचे श्रेष्ठत्व श्रीकृष्णांबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की, ही आणि केवळ अनावश्यक प्रशंसा आहे त्यांच्यासाठी, जरी ते भगवद्भक्तीमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुस्तर आहे. अशा लोकांना संसिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्त्व आहे.

« Previous Next »