TEXT 33
kiṁ punar brāhmaṇāḥ puṇyā
bhaktā rājarṣayas tathā
anityam asukhaṁ lokam
imaṁ prāpya bhajasva mām
किम्-किती; पुनः-पुन्हाः ब्राह्मणाः-ब्राह्मणः पुण्याः-सदाचारी; भक्ताः-भक्त; राज ऋषयः—राजर्षी; तथा—सुद्धा; अनित्यम्—अनित्य; असुखम्—दुःखमय; लोकम्-लोक; इमम्-या; प्राप्य-प्राप्त होऊन; भजस्व-प्रेममयी सेवेमध्ये युक्त हो; माम्-मला किंवा माझ्या.
तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षीबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो.
तात्पर्य: या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे; परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, अनित्यम् असुख' लोकम्-हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे. आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही. भगवंत स्वत: घोषित करतात की, हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे. काही दर्शनिक, विशेषकरून मायावादी दर्शनिक म्हणतात की, हे जग मिथ्या आहे; परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की, हे जग मिथ्या नसून अनित्य आहे. मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे. हे जग अनित्य आहे. तथापि, दुसरेही एक जग आहे की, जे नित्य, शाश्वत आहे. हे जग दु:खमय आहे; परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे.
अर्जुनाचा जन्म राजर्षी कुळामध्ये झाला होता. त्यालासुद्धा भगवंत सांगतात की, 'माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये. 'दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये. प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे, जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल. भगवद्भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने कृष्णभावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे.