No edit permissions for मराठी

TEXT 15

pāñcajanyaṁ hṛṣīkeśo
devadattaṁ dhanañ-jayaḥ
pauṇḍraṁ dadhmau mahā-śaṅkhaṁ
bhīma-karmā vṛkodaraḥ

पाञ्चजन्यम्- पाञ्चजन्य नावाचा शंख; हृषीक-ईश:- हृषीकेश (श्रीकृष्ण, जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात); देवदत्तम्-देवदत्त नावाचा शंख; धनम्-जय:- धनंजय (धनावर विजय प्राप्त करणारा अर्जुन); पौण्ड्रम्-पौण्ड्र नावाचा शंख; दध्मौ-वाजविला; महा-शङ्खम्-भीषण शंख;भीम-कर्मा- अतिदुष्कर कर्म करणारा; वृक-उदर:- बेसुमार भक्षण करणारा भीम.

भगवान श्रीकृष्णांनी आपला पाञ्चजन्य नावाचा शंख वाजविला; अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौण्ड्र नामक शंख वाजविला.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्‍लोकामध्ये हृषीकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरुपे आहेत. निर्विशेषवादी, जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वत: त्यांचे इंद्रिय-नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना हृषीकेश या विशिष्ट नावे संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यांनुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे, कारण त्यांनी मधू नामक दैत्याचा वध केला; त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात; त्यांचे नाव वासुदेव आहे, कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले; त्यांचे नाव देवकीनंदन आहे, कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला; त्यांचे नाव यशोदानंदन आहे, कारण त्यांनी वृदांवनामध्ये आपल्या बाल्यालीला यशोदामातेबरोबर केल्या; त्यांचे नाव पार्थसारथी आहे, कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले, तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना हृषीकेश हे नाव पडले.

     या श्‍लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे. कारण विविध प्रकारच्या यज्ञयागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला तेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती, तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासाठी अतिश कठीण कार्ये करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडवपक्षातील, आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले.विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मीदेवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला.

« Previous Next »