No edit permissions for मराठी

TEXT 14

tataḥ śvetair hayair yukte
mahati syandane sthitau
mādhavaḥ pāṇḍavaś caiva
divyau śaṅkhau pradadhmatuḥ

तत:- त्यानंतर; श्वेतै:- श्‍वेत किंवा शुभ; हयै:-घोड्यांनी; युक्ते-युक्त अशा; महति-एका महान; स्यन्दने-रथात; स्थितौ-स्थित; माधव:-श्रीकृष्ण (लक्ष्मीपती); पाण्डव:- पांडुपुत्र अर्जुन; च-सुद्धा; एव- निश्चितच; दिव्यौ-दिव्य; शङ्खौ-शंख; प्रदध्मतु:- वाजविले.

दुसऱ्या बाजूला, शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख  वाजविले.

तात्पर्य: भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की, पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची अशा नव्हती. जयस्तु पाण्डुपुत्राणां येषां पक्षे जनार्दन:- पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात, त्या ठिकाणी लक्ष्मीदेवीसुद्धा असते. कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहता नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की, भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. याव्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते, तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की, हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयप्राप्ती करू शकतो.

« Previous Next »