No edit permissions for मराठी

TEXT 27

uccaiḥśravasam aśvānāṁ
viddhi mām amṛtodbhavam
airāvataṁ gajendrāṇāṁ
narāṇāṁ ca narādhipam

उच्चै:श्रवसम्-उच्चैश्रवा; अश्वानाम्-अश्वांमध्ये; विद्धि-जाण; माम्-मला; अमृतउद्रवम्-समुद्रमंथनापासून उत्पन्न झालेला; ऐरावतम्-ऐरावत; गज-इन्द्राणाम्-गजेंद्रांमध्ये (हत्ती); नराणाम्-मनुष्यांमध्ये; -आणि; र-अधिपम्-राजा.

अमृताप्राप्तीकरिता केलेल्या समुद्रमंथातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व, उच्चैश्रवा मीच आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे.

तात्पर्यः सुर आणि असुरांनी एकेकाळी समुद्रमंथन केले. या मंथनापासून अमृत आणि विष उत्पन्न झाले आणि भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. अमृतापासून अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या व त्यापैकी उच्चैश्रवा अश्व हा एक होय. त्याचबरोबर ऐरावत नामक हत्तीही उत्पन्न झाला. दोन्ही प्राण्यांची अमृतापासून उत्पत्ती झाल्यामुळे त्या दोघांनाही विशिष्ट महत्त्व आहे आणि हे दोघेही श्रीकृष्णांची रूपेच आहेत.

          मनुष्यांमध्ये राजा हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे, कारण श्रीकृष्ण हे ब्रह्मांडाचे पालनपोषणकर्ते आहेत आणि ज्या राजांना त्यांच्या दैवी गुणांमुळे राजाच्या पदावर नियुक्त केले जाते ते आपापल्या राज्याचे पालनपोषण करतात. युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज आणि भगवान श्रीराम यांच्यासारखे राजे हे अत्यंत धर्मनिष्ठ होते आणि ते सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणाचाच विचार करीत असत. वेदांमध्ये राजाला भगवंतांचा प्रतिनिधी मानण्यात येते. तथापि, या युगामध्ये धर्माच्या -हासाबरोबरच राजसत्ताक पद्धतीची अवनती झाली आणि आता तर ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरीही आपण जाणले पाहिजे की, प्राचीन काळी धर्मनिष्ठ राजांच्या अमलाखाली जनता अधिक सुखी होती.

« Previous Next »