TEXT 50
sañjaya uvāca
ity arjunaṁ vāsudevas tathoktvā
svakaṁ rūpaṁ darśayām āsa bhūyaḥ
āśvāsayām āsa ca bhītam enaṁ
bhūtvā punaḥ saumya-vapur mahātmā
सञ्जयः उवाच- संजय म्हणाला;इति—याप्रमाणे, अर्जुनम्—अर्जुनाला; वासुदेवः—कृष्ण;तथा— तसे; उक्त्वा-बोलून; स्वकम्-आपले स्वतःचे; रूपम्-रूप; दर्शयाम् आस-दाखविले; भूय:-पुन्हा; आश्वासयाम् आस-आश्वासित केले, धीर दिला; च-सुद्धा; भीतम्-भयभीत; एनम्-त्याला; भूत्वा-होऊन; पुन:-पुन्हा; सौम्य-वपुः-सुंदर रूप; महा-आत्मा-महात्मा.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला.
तात्पर्य: श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव-देवकीपुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले; परंतु आपल्या मातापित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतर साधारण बालकामध्ये केले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना माहीत होते की, चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही; परंतु अर्जुनाने चतुर्भुजरूप दाखविण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी हे रूप दाखविले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केले. सौम्यवपुः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे सौम्य-वपुः म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते. श्रीकृष्ण हे सृष्टीचे नियंता असल्याकारणाने त्यांनी आपल्या भक्ताचे, अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्याला आपले सुंदर रूप, कृष्ण-रूप दाखविले. ब्रह्मसंहितेत (५.३८) म्हटले आहे की, प्रेमाञ्जनच्छुरित भक्तिविलोचनेन-ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचे अंजन घातलेले आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे सुंदर रुप पाहू शकतो.