No edit permissions for मराठी

TEXT 52

śrī-bhagavān uvāca
su-durdarśam idaṁ rūpaṁ
dṛṣṭavān asi yan mama
devā apy asya rūpasya
nityaṁ darśana-kāṅkṣiṇaḥ

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; सु-दुर्दर्शम्-पाहण्यास मिळणे अत्यंत दुष्कर; इदम्‌-हे; रूपम्-रूप; दृष्टवान् असि-जे तू पाहिले आहेस; यत्-जे; मम-माझे; देवाः-देवता; अपि-सुद्धा; अस्य-या; रूपस्य-रूपः नित्यम्-नित्यः दर्शन-काङ्क्षणः-दर्शनाची अभिलाषा, आकांक्षा करणारे.

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! आता तू जे माझे रूप पाहात आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात.

तात्पर्य: या अध्यायाच्या अठ्ठेचाळिसाव्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले आणि अर्जुनाला सांगितले की, पुण्यसंचय, यज्ञयाग इत्यादी केल्याने हे विश्वरूपदर्शन होणे शक्य नाही. या श्लोकात योजिलेले सुदुर्दर्शमा शब्द दर्शवितो की, श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे. मनुष्य तपोमिश्रित भक्ती, ज्ञानमिश्रित भक्ती इत्यादींद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल, परंतु भक्तीच्या मिश्रणावाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही आणि या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे. या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांनासुद्धा अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अतिशय उत्कट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद्भागवतात मिळते की, जेव्हा श्रीकृष्ण माता, देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांचे अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता जमल्या होत्या. त्या वेळी जरी त्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी त्यांनी भगवंतांचे सुंदर रीतीने स्तवन केले. सर्व देवदेवता भगवंतांच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते. केवळ महामूर्खच, श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरी स्थित असणा-या कोणत्या तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात, परंतु हे सर्व दृष्टिकोण निरर्थक आहेत. वस्तुत: ब्रह्मदेव आणि महादेवांसारख्या महान देवदेवताही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात.

          भगवद्गीतेतही (९.११) या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे की, अवजानति मांमूढा मानुषीं तुमश्रितम्‌-त्यांचा उपहास करणा-या मूखांना ते प्रकट होत नाहीत. ब्रह्मसंहितेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंद आहे. त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो. परंतु जे भगवद्गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात. प्राकृत दृष्टीचा अवलंब करणा-यांना वाटते की, श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्वज्ञानी होते आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले. त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की, परम सत्य हे निर्विशेष आहे आणि परम सत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे. भवंतांविषयीची ही प्राकृत संकल्पना आहे. दुसरा एक दृष्टिकोण तर्कवादी आहे. जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णाविषयी तर्क करतात आणि भगवंतांच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात. याप्रमाणे काहीजणांना वाटते की, अर्जुनासमोर प्रकट केलेले श्रीकृष्णांचे विश्वरूप हे श्रीकृष्णांच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परम सत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे. त्यांचा विश्वास असतो की, अंतिमतः परम सत्य हे निर्विशेष असते. परंतु भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे व ती म्हणजे प्रामाणिक व्यक्तींकडून (आचार्यांकडून) कृष्णकथा श्रवण करणे ही होय. हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविकपणे वैदिक परंपरेमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तींकडून कृष्णकथा श्रवण करतात आणि पुन:पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्णप्रेम वाढते. आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आपल्या योगमायेने आवृत्त झाले आहेत. कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाही किंवा दर्शन देत नाहीत. ते स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात केवळ तोच त्यांना पाहू शकतो. वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की, जो शरणागत जीव आहे तोच परम सत्य यथार्थ रूपाने जाणू शकतो. निरंतर कृष्णभावना आणि कृष्णभक्तीद्वारे योग्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार देवदेवतांनाही होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठतर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात. याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की, श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्यामसुंदर रूपाचे दर्शन तर त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे.

« Previous Next »