No edit permissions for मराठी

TEXTS 18-19

samaḥ śatrau ca mitre ca
tathā mānāpamānayoḥ
śītoṣṇa-sukha-duḥkheṣu
samaḥ saṅga-vivarjitaḥ

tulya-nindā-stutir maunī
santuṣṭo yena kenacit
aniketaḥ sthira-matir
bhaktimān me priyo naraḥ

सम:-समान; शत्रौ-शत्रूच्या; -आणि; मित्रे-मित्राच्या ठिकाणी;-सुद्धा; तथा-म्हणून; मान-मान; अपमानयोः-आणि अपमानामध्ये; शीत-थंडीमध्ये; उष्ण-उष्ण; सुख-सुख; दुःखेषु-आणि दु:ख, सम:-समभाव; सङ्ग-विवर्जितः-सर्व प्रकारच्या संगापासून मुक्त; तुल्य-समान; निन्दा-निंदा, स्तुतिः-आणि स्तुती; मौनी-मौन धारण करणारा; सन्तुष्टः-संतुष्ट; येन केनचित्-कोणत्याही; अनिकेत:-घर नसणारा; स्थिर-स्थिर; मतिः-निश्चय; भक्तिमान्— भक्तीमध्ये संलग्न झालेला; मे-मला, प्रियः-प्रिय; नरः-मनुष्य.

जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत-उष्ण, सुख-दुःख, स्तुती-निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे.

तात्पर्य: भक्त सदैव कुसंगापासून मुक्त असतो. मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते, मानव-समाजाचा हा स्वभावच आहे. भक्त हा नेहमी लौकिक स्तुती-निंदा, सुखदु:ख इत्यादींच्या पलीकडे असतो. तो अत्यंत सहनशील असतो. कृष्णकथेवाचून इतर काहीही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते. मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये. केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत्कथा होय. भक्त हा सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो, त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी मिळणारही नाही; परंतु तो तृप्त असतो. तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही. तो कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील; परंतु त्याला कशाचेही आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते, कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो. भक्ताच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल; परंतु भक्ताने हे सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्याकरिता ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असूच शकत नाहीत. भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजे. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही तर कृष्णभावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते.

« Previous Next »