TEXT 2
śrī-bhagavān uvāca
mayy āveśya mano ye māṁ
nitya-yuktā upāsate
śraddhayā parayopetās
te me yukta-tamā matāḥ
श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; मयि-माझ्या ठायी; आवेश्य-स्थिर करून; मन:- मनाला; ये-जे; माम्-मला; नित्य-नित्य; युक्ता:-संलग्न; उपासते-भजतात; श्रद्धया-श्रद्धेने; परया-दिव्य; उपेताः-युक्तः ते-ते; मे-माझ्या; युक्त-तमाः-योगातील परमोच्च सिद्धी; मता:-मानले जातात.
श्रीभगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत.
तात्पर्य: अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की, जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो तोच योग्यांमधील परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्णभावनाभावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णांप्रीत्यर्थच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्णकथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णांसाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिरमार्जन करतो अथवा भोजनपात्र स्वच्छ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवंतांप्रीत्यर्थच करतो व अशा रीतीने एक क्षणही वाया घालवीत नाही. असे कर्म म्हणजेच समधिस्थ कर्म होय.