No edit permissions for मराठी

TEXT 5

kleśo ’dhika-taras teṣām
avyaktāsakta-cetasām
avyaktā hi gatir duḥkhaṁ
dehavadbhir avāpyate

क्लेश:-क्लेशदायक; अधिक-तर:-अत्यधिक; तेषाम्-त्यांची; अव्यक्त-अव्यक्ताप्रती; आसक्त-आसक्त; चेतसाम्-ज्याचे मन; अव्यक्ता-अव्यक्ताप्रती; हि-खचितच; गतिः-प्रगती; दुःखम्-दुःखकारक; देह-वद्रिः-देहधान्यांना; अवाप्यते-प्राप्त होते.

ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय कलेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते.

तात्पर्य: योगिजन परम सत्याच्या अचिंत्य, अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते आणि जे योगी पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन भगवद्भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते. आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांतील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंतांकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे, तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहजसुलभ आणि स्वाभाविकच आहे. अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांतरूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अर्चाविग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो, कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा त-हेने उपयोग करता येतो. अर्थात, मंदिरातील भगवंतांच्या अर्चा विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. वैदिक प्रमाणांनुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील अर्चाविग्रहाचे पूजन हे देखिल सगुण होय, कारण भगवंत भौतिक तत्वांद्वारे प्रकट झालेले असतात; परंतु पाषाण, काष्ठ किंवा रंगाद्वारे भगवंतांचे अर्चाविग्रह प्रकट झाले असले तरी ते अर्चाविग्रह प्राकृत नसतात. हे भगवंतांचे परिपूर्णत्व आहे.

          या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल. आपल्याला रस्त्यावर काही टपालपेट्या दिसतात. आपण जर त्यात आपली पत्रे टाकली तर ती साहजिकच विनाअडचण आपल्या इटस्थळी जाऊन पोहोचतात. परंतु टपालखात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा नकली पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपयुक्त कार्य होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रहरूपामध्ये अधिकृतरीत्या प्रकट होतात त्या विग्रहालाच अर्चाविग्रह  असे म्हटले जाते. हे अर्चाविग्रह म्हणजे भगवंतांचा अवतारच असतो. परमेश्वर या अर्चाविग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत हे सर्वशक्तिमान आहेत म्हणून अर्चाविग्रहरूपी अवताराद्वारे ते भक्तांची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी.

          म्हणून भक्ताला तात्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंतांकडे जाणे मुळीच कष्टप्रद नसते; परंतु जे आध्यात्मिक अनुभूतीकरिता निर्विशेषवादाचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो. त्यांना उपनिषदांद्वारे परम सत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गर्भितार्थ जाणावा लागतो. त्यासाठी संस्कृत भाषाही शिकावी लागते. इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतींचा अनुभव घ्यावा लागतो. हे सर्व साधारण मनुष्यांसाठी सोपे नसते. भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्णभावनाभावित मनुष्याला केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने, नियमितपणे अर्चाविग्रहला केवळ वंदन केल्याने, भगवंतांचे गुणगान श्रत्तण केल्याने आणि केवळ भगवतप्रसाद ग्रहण केल्याने भगवंतांची अनुभूती सहजपणे होते. शेवटी परम सत्याचा साक्षात्कार होण्याची शाश्वती नसलेल्या क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करीत आहेत यात काहीच संदेह नाही. परंतु साकारवादी विनाक्लेश कोणत्याही धोक्याविना प्रत्यक्ष भगवंतांचीच प्राप्ती करतात. याच प्रकारचे वर्णन श्रीमद्‌भागतातही आढळते. त्या ठिकाणी असे म्हटले आहे की, शेवटी मनुष्याला भगवंतांना शरण जावेच लागते. (या शरणागतीलाच भक्ती असे म्हणतात) परंतु जर त्यांनी 'नेति नेति' म्हणून ब्रह्म जाणण्याचे परिश्रम घेतले आणि आपले सर्व आयुष्य याच रीतीने व्यतीत केले तर यांची परिणती शेवटी क्लेशामध्येच होते. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, आध्यात्मिक साक्षात्काराच्या या क्लेशदायक मार्गाचे अनुसरण करू नये कारण, अंतिम परिणामाची या मार्गामध्ये शाश्वती नसते.

          जीवाला स्वत:चे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हावयाचे असेल तर त्याला आपल्या सत् आणि चित् स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही. एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो. कारण तो निर्विशेषवादाच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्याने निर्विशेषवादाचे दीर्घकाळ केलेले अनुसरणही क्लेशदायक असते. म्हणून देहधारी जीवासाठी निर्विशेषवाद हा आचरण करतेवेळी आणि साक्षात्कार करतेवेळी क्लेशदायकच ठरतो. प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की, निराकाराचा साक्षात्कार हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे. म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रत्येक जीवासाठी कृष्णभावना, भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्तियोगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे, इंद्रियातीत, अचिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करण्यास विशेषत: या कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णांनीही या मार्गाची शिफारस केलेली नाही.

« Previous Next »