No edit permissions for मराठी

TEXT 26

anye tv evam ajānantaḥ
śrutvānyebhya upāsate
te ’pi cātitaranty eva
mṛtyuṁ śruti-parāyaṇāḥ

अन्ये-इतर; तु-परंतु; एवम्-याप्रमाणे, अजानन्त:-आध्यात्मिक ज्ञानरहित, श्रुत्वा-ऐकून; अन्येभ्यः-इतरांपासून; उपासते-उपासना करतात; ते-ते; अपि-सुद्धा; -आणि; अतितरन्ति-पार करतात किंवा अतीत होतात; एव-निश्चितपणे; मृत्युम्-मृत्युमार्ग, श्रुतिपरायणा:- श्रवण करण्याकडे ओढा असणारे.

असे इतरही आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म-मृत्यूचा मार्ग पार करतात.

तात्पर्यः हा श्लोक विशेषकरून आधुनिक समाजाला लागू होतो, कारण आधुनिक समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभावच आहे. काही लोक नास्तिकवादी, अज्ञेयवादी किंवा तत्त्वज्ञानी असल्याचे प्रतीत होईल, परंतु वस्तुतः त्यांना तत्वज्ञानाचा मुळी गंधच नसतो. साधारण मनुष्याच्या बाबतीत सांगावयाचे तर, तो पुण्यात्मा असेल तर श्रवणाद्वारे त्याला प्रगती करण्याची सुसंधी प्राप्त होते. हा श्रवणविधी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आधुनिक जगतामध्ये, कृष्णभावनेचा प्रसार केलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रवण करण्यावर अधिक जोर दिला आहे, कारण जर सामान्य मनुष्याने अधिकारी व्यक्तींकडून केवळ श्रवण केले तर तो प्रगती करू शकतो, विशेषकरून श्री चैतन्य महाप्रभू यांच्यानुसार त्याने हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे/ या दिव्य ध्वनीचे श्रवण करावे. म्हणून असे सांगण्यात आले आहे की, लोकांनी आत्मसाक्षात्कारी व्यक्तींकडून श्रवण करून स्वतःचा लाभ करून घेतला पाहिजे आणि त्यायोगे क्रमाक्रमाने सर्व काही जाणण्यास समर्थ बनले पाहिजे. त्यानंतर निःसंदेह भगवंतांची उपासना घडेल. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की, या युगात मनुष्याने आपली स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाही तर त्याने तर्काने परम सत्य जाणण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्याग केला पाहिजे. ज्यांना भगवत्‌ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांचा सेवक बनण्यास मनुष्याने शिकले पाहिजे. जर शुद्ध भक्ताचा आश्रय आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे श्रवण करून त्यांच्या पदचिह्नांचे अनुसरण करण्याइतपत भाग्यवान असेल तर हळूहळू तो शुद्ध भक्त होण्याइतपत उन्नत होऊ शकतो. विशेषकरून या श्लोकामध्ये श्रवण विधीवर निक्षून जोर देण्यात आला आहे आणि हे योग्यच आहे. सामान्य मनुष्याची जरी तथाकथित तत्वज्ञान्यांप्रमाणे योग्यता नसली तरी अधिकृत व्यक्तींकडून श्रद्धेने श्रवण केल्यामुळे त्याला भौतिक जीवनाच्या पलीकडे जाण्यास मदत होते आणि तो स्वगृही, भगवद्धामास परत जाऊ शकतो.

« Previous Next »