TEXT 3
kṣetra-jñaṁ cāpi māṁ viddhi
sarva-kṣetreṣu bhārata
kṣetra-kṣetrajñayor jñānaṁ
yat taj jñānaṁ mataṁ mama
क्षेत्र-ज्ञम्-क्षेत्रज्ञ; च-सुद्धा; अपि-निश्चितच; माम्-मला; विद्धि-जाणः सर्व-सर्व; क्षेत्रेषु-क्षेत्रांमध्ये; भारत-हे भारत; क्षेत्र-क्षेत्र (शरीर); क्षेत्र-ज्ञयोः-क्षेत्रज्ञः ज्ञानम्-ज्ञान; यत्-जे; तत्-ते; ज्ञानम्-ज्ञान; मतम्-मत; मम-माझे,
हे भारत! मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. हे माझे मत आहे.
तात्पर्य: क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करताना आपल्याला, भगवंत, जीव आणि जड प्रकृती हे तीन विविध अभ्यासयोग्य विषय आढळतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये, दोन आत्मे असतात, व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा. परमात्मा हे भगवंतांचे विस्तारित रूप असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की, 'मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, परंतु मी शरीरातील जीवात्मा नाही. मी परमात्मा आहे. मी प्रत्येक देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतो.'
भगवद्गीतेच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे सूक्ष्मरीतीने अध्ययन करतो त्याला ज्ञानप्राप्ती होते.
भगवंत म्हणतात की, ते प्रत्येक शरीरातील कार्यक्षेत्राचे ज्ञाता आहेत. जीवाला आपल्या शरीराचे ज्ञान असते; परंतु इतर शरीरांचे त्याला ज्ञान असू शकत नाही. परमात्मा रूपाने सर्व शरीरांमध्ये उपस्थित असणारे भगवंत सर्वच देहांच्या बाबतीत सर्व काही जाणतात. त्यांना सर्व योनींतील सर्व शरीरांचे ज्ञान असते. एखाद्या नागरिकाला स्वत:च्या भूमीचे सर्व काही ज्ञान असू शकेल, परंतु राजाला केवळ राजमहालाचेही नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे असणा-या सर्व मालमतेचेही ज्ञान असते. त्याप्रमाणे मनुष्य केवळ स्वत:च्याच शरीराचा स्वामी असू शकेल; परंतु भगवंत सर्वच शरीरांचे स्वामी आहेत. राजा हा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक हे दुय्यम प्रकारचे स्वामी असतात. त्याचप्रमाणे भगवंत हे सर्व शरीरांचे परम अधिपती आहेत.
शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते. भगवंत हे हृषीकेश, अर्थात इंद्रियांचे नियंत्रक आहेत. ज्याप्रमाणे राजा हा राज्याचा मूळ नियंता असतो आणि नागरिक हे दुय्यम नियंते असतात त्याचप्रमाणे भगवंत इंद्रियांचे मूळ नियंता आहेत. भगवंत म्हणतात की, 'मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे.' अर्थात, भगवंत परमक्षेत्रज्ञ आहेत तर जीव हा केवळ आपल्याच शरीराचा क्षेत्रज्ञ आहे. वेदांमध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे.
क्षेत्राणि हि शरीराणि बीजं चापि शुभाशुभे।
तानि वेत्ति स योगात्मा तत: क्षेत्रज्ञ उच्यते ।।
या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी व भगवंत वास करतात. भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ यांतील भेद पुढीलप्रमाणे सांगितला आहे. वेदांनुसार शरीर, जीव आणि परमात्मा यांतील भेदाभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय. श्रीकृष्णांचे असे मत आहे. जीव आणि परमात्मा यांतील भेदाभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय. ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसते तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. मनुष्याने प्रकृती, पुरुष आणि ईश्वर यांचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. या तीन तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये गोंधळून जाऊ नये. मनुष्याने चित्रकार, चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळून जाऊ नये. हे भौतिक जगत, अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोक्ता म्हणजे जीव आहे आणि या दोहोंपेक्षा श्रेष्ठ परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत. श्वेताश्वतरोपनिषदात (१.१२) सांगितले आहे की, भोक्ता भोग्यं प्रेरितारं च मत्वा। सर्वम् प्रोक्तम् त्रि-विधिम् ब्रह्मम एतत् -तीन ब्रह्म संकल्पना आहेत, कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती ब्रह्म आहे आणि भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीवही ब्रह्म आहेत आणि या दोघांचा नियंत्रकही ब्रह्मच आहे, परंतु तो वास्तविक नियंता आहे.
या अध्यायामध्ये सांगितले जाईल की, दोन क्षेत्रज्ञांपैकी, एक च्युत, ज्याचे पतन होऊ शकते आणि दुसरा अच्युत, ज्याचे कधीही पतन होत नाही. एक श्रेष्ठ आहे तर दुसरा गौण आहे. दोन्ही क्षेत्रज्ञ एकसमानच आहेत असे जो म्हणतो तो भगवंतांच्या कथनाचा विरोध करतो, कारण या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की, 'मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे.'जो एखाद्या दोरीला सर्प समजतो तो ज्ञानी असू शकत नाही. विविध प्रकारचे देह आहेत आणि विविध प्रकारचे देहांचे मालक आहेत. प्रत्येक जीवाला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्वत:ची अशी क्षमता असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारची शरीरे आहेत. परंतु त्या शरीरांमध्ये भगवंतही नियंता म्हणून उपस्थित आहेत. च हा शब्द महत्वपूर्ण आहे कारण हा सर्व प्रकारची शरीरे दर्शवितो. हे श्रील बलदेव विद्याभूषण यांचे मत आहे. प्रत्येक शरीरामध्ये जीवात्म्याबरोबरच श्रीकृष्णही परमात्मारूपामध्ये उपस्थित असतात. श्रीकृष्ण येथे स्पष्टपणे सांगतात की, परमात्मा हा क्षेत्र आणि परिमित भोक्ता या दोहोंचाही नियंत्रक आहे.