No edit permissions for मराठी

TEXT 35

kṣetra-kṣetrajñayor evam
antaraṁ jñāna-cakṣuṣā
bhūta-prakṛti-mokṣaṁ ca
ye vidur yānti te param

क्षेत्र-शरीरं, क्षेत्रः क्षेत्र-ज्ञयोः-क्षेत्रज्ञ किंवा शरीराचा स्वामी; एवम्—याप्रमाणे; अन्तरम्-भेद; ज्ञान-चक्षुषा-ज्ञानचक्षूनी; भूत-जीवाचे; प्रकृति-भौतिक प्रकृतीपासून; मोक्षम्-मोक्ष; चसुद्धा; ये-जे; विदुः-जाणतात; यान्ति-प्राप्त होतात; ते-ते; परम्-परम.

जे ज्ञानचक्षूने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते.

तात्पर्य: या तेराव्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की, मनुष्याने क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा. आठव्या श्लोकापासून ते बाराव्या श्लोकापर्यंत वर्णन केलेला मोक्षमार्ग जाणल्याने त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होऊ शकते.

          श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरासंबंधी श्रवण करण्याकरिता आणि त्यायोगे हळूहळू प्रबुद्ध होण्याकरिता सत्संगाची आवश्यकता आहे. जर मनुष्याने आध्यात्मिक गुरूचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन तत्त्वातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक साक्षात्कारातील उत्तरोत्तर प्रगतीची ही प्रथम पायरी बनते. आध्यात्मिक गुरू हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त होण्यास शिकवितो. उदाहरणार्थ, भगवद्गीतेत, श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनांतून मुक्त होण्याचा उपदेश देत आहेत.

          हा देह म्हणजे जडतत्व आहे हे मनुष्याला समजू शकते. चोवीस तत्वांसह असणा-या या देहाचे विश्लेषण करता येते. शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे, तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो. परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो आणि त्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत. या भौतिक जगताचे संचालन जीव आणि चोवीस तत्त्वांच्या संयोगामुळे होते हे जो पाहू शकतो आणि त्याचबरोबर परमात्म्याचीही स्थिती पाहू शकतो तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत आणि मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या साहाय्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

          या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ या तेराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous