TEXTS 22-25
śrī-bhagavān uvāca
prakāśaṁ ca pravṛttiṁ ca
moham eva ca pāṇḍava
na dveṣṭi sampravṛttāni
na nivṛttāni kāṅkṣati
udāsīna-vad āsīno
guṇair yo na vicālyate
guṇā vartanta ity evaṁ
yo ’vatiṣṭhati neṅgate
sama-duḥkha-sukhaḥ sva-sthaḥ
sama-loṣṭāśma-kāñcanaḥ
tulya-priyāpriyo dhīras
tulya-nindātma-saṁstutiḥ
mānāpamānayos tulyas
tulyo mitrāri-pakṣayoḥ
sarvārambha-parityāgī
guṇātītaḥ sa ucyate
श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; प्रकाशम्-प्रकाश; च-आणि; प्रवृत्तिम्-आसक्ती; च-आणि; मोहम्-मोह; एव च-सुद्धा; पाण्डव-हे पांडव; न द्वेष्टि-द्वेष करीत नाही; सम्रवृत्तानि-विकसित झाले तरी; न निवृत्तानि-तसेच विकसन न थांबविता; काङ्क्षति-इच्छा करती; उदासीन-वत्—उदासीनासारख्या; आसीनः-स्थित; गुणें:-गुणांद्वारे; यः-जो मनुष्य; न-कधीही नाही; विचाल्यते-विचलित होतो; गुणा:-गुण; वर्तन्ते-कार्य करतात; इति एवम्-याप्रमाणे जाणून; यः-जो; अवतिष्ठति-राहतो; न-कधीही नाही; इङ्गते-विचलित होतो; सम-समान; दु:ख-दुःखामध्ये; सुखः-आणि सुखामध्ये; स्व-स्थ:-स्वतःमध्येच स्थित झाल्यामुळे; सम-समान; लोष्ट-माती; अश्म-दगड; काञ्चन:-सोने; तुल्य-सारखेच; प्रिय-प्रिय; अप्रियः-आणि अप्रिय; धीरः -धीर; तुल्य-समान; निन्दा-निंदेमध्ये; आत्म-संस्तुतिः-आणि स्वतःचीच स्तुती; मान-मानामध्ये; अपमानयोः-आणि अपमान; तुल्य:-सारखा; तुल्यः-समान; मित्र-मित्राचा; अरि-आणि शत्रू: पक्षयोः-पक्षांची; सर्व-सर्व; आरम्भ- प्रयत्न किंवा उद्योग; परित्यागी–परित्यागी, गुण-अतीतः -गुणातीत; सः -तो; उच्यते-असे म्हटले जाते.
श्रीभगवान म्हणाले, हे पांडुपुत्र! जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही; जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो; जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो; जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो; जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो; जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो; जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते.
तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या तीन निरनिराळ्या प्रश्नांची एकामागून एक उत्तरे दिली आहेत. या श्लोकामध्ये सर्वप्रथम श्रीकृष्ण सांगतात की, दिव्यावस्थेमध्ये स्थित झालेल्या मनुष्यामध्ये द्वेषभावना नसते आणि त्याला कशाचीही लालसा नसते. भौतिक देहाने बद्ध केलेला जीव जेव्हा या भौतिक जगतात राहतो तेव्हा जाणले पाहिजे की, तो त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो. जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो. परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे. देहात्मबुद्धीचे सहजगत्या विस्मरण होण्यासाठी त्याने भगवद्भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. मनुष्यात जोपर्यंत देहतादात्म्याची जाणीव असते तोपर्यंत तो केवळ इंद्रियतृप्त्यर्थ कर्म करतो; परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णांच्या ठायी अर्पण करतो तेव्हा इंद्रियतृप्ती आपोआपच थांबते. मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही तसेच त्याने देहाच्या आदेशांचे पालन करण्याचीही आवश्यकता नाही. शरीरामधील प्राकृतिक गुण कार्य करतीलच, परंतु आत्मा अशा क्रियांपासून अलिप्तच असतो. तो अलिप्त कसा होतो? तर तो देहाचा उपभोग घ्यावयाचीही इच्छा करीत नाही किंवा देहाच्या बाहेरही जाण्याची इच्छा करीत नाही. याप्रमाणे दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यामुळे भक्त आपोआपच मुक्त होतो. त्याने प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही.
पुढील प्रश्न हा दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीच्या व्यवहाराशी संबंधित आहे. भौतिक गोष्टीत आसक्ती असलेल्या मनुष्यावर शरीराला प्राप्त झालेल्या तथाकथित मान आणि अपमानाचा परिणाम होतो. तथापि, दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या मनुष्यावर अशा तथाकथित मानापमानाचा परिणाम होत नाही. तो आपले कृष्णभावनमय कर्म करतो आणि इतर कोणी त्याला मान देतो किंवा आपला अपमान करतो याविषयी विचारही करीत नाही. आपल्या कृष्णभावनाभावित कर्मास अनुकूल गोष्टींचा तो स्वीकार करतो. अन्यथा त्याला कोणत्याही वस्तूची मग ते सोने असो अथवा दगड, आवश्यकता नसते. कृष्णभावनाभावित कर्म करण्यास जो त्याला साहाय्य करतो त्याला तो आपला प्रिय मित्र समजतो आणि तो आपल्या तथाकथित शत्रूचा द्वेष करीत नाही. तो सर्वत्र समभावाने पाहतो आणि सर्व काही एकाच स्तरावर असल्याचे पाहतो, कारण तो पूर्णपणे जाणतो की, आपल्याला या भौतिक जीवनाशी मुळीच कर्तव्य नाही. क्षणिक उलथापालथ आणि उत्पातांचे स्वरूप जाणीत असल्याने सामाजिक आणि राजकीय विषयांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो स्वत:च्या स्वार्थासाठी कोणतेही कर्म करीत नाही. तो श्रीकृष्णांप्रीत्यर्थ काहीही करू शकतो, पण स्वतःसाठी मात्र तो काहीही करीत नाही. अशा आचरणामुळे मनुष्य वास्तविकपणे दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो.