No edit permissions for मराठी

TEXT 1

śrī-bhagavān uvāca
ūrdhva-mūlam adhaḥ-śākham
aśvatthaṁ prāhur avyayam
chandāṁsi yasya parṇāni
yas taṁ veda sa veda-vit

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; ऊर्ध्व-मूलम्-वर मूळ असलेला; अधः-खाली; शाखम्—शाखा;अश्वत्थम्—वटवृक्ष; प्राहुः—म्हटले जाते, अव्ययम्-शाश्वत;छन्दसि—वैदिक मंत्र; यस्य-ज्याची; पणनि-पाने; यः-जो कोणी, तम्—त्याला; वेद-जाणतो; सः-तो; वेद-वित्-वेदांचा जाणता, वेदवित.

श्रीभगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे, ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो

तात्पर्य: भक्तियोगाच्या महत्त्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारील की, 'मग वेदांबद्दल काय?' या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की, वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय. म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेला कृष्णभावनाभावित मनुष्य पूर्वीच वेदवेत्ता असतो.

या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे. जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. तो एका शाखेवरून दुस-या शाखेवर, दुस-यावरून तिस-या असे नेहमी भटकत राहतो. या भौतिक संसाररूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही. वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरिता आहेत आणि हे मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाची मूळे उध्वदिशेने वाढतात, कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षातून बाहेर पडू शकतो.

          सुटका होण्याची ही पद्धत जाणून घेतली पाहिजे. या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक विधी आहेत. याचे वर्णन पूर्वीच्या अध्यायांमध्ये करण्यात आले आहे आणि तेराव्या अध्यायापर्यंत आपण पाहिले की, भगवद्भक्ती हीच सर्वोत्तम विधी आहे. भक्तीचे मूलभूत तत्त्व म्हणजे भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत्सेवेप्रति आसक्ती होय. या भौतिक जगताशी असणारी आसक्ती भेदण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आली आहे. या संसाररूपी वृक्षाची मूळे उध्र्वदिशेने वाढतात. याचा अर्थ असा आहे की, महत्-तत्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकापासून ते मूळ खाली येते. त्या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि यामध्ये अनेक शाखारूपी विविध ग्रहमालिकांचा समावेश होतो. वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही कर्मफले होत.

          या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर असलेला वृक्ष आढळत नसला तरी असाही वृक्ष अस्तित्वात असतो. असा वृक्ष जलाशयाच्या तीरावर आढळू शकतो. आपण पाहू शकतो की, तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळ वर असल्याचे आढळते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगत्रूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते.प्रतिबिंबीत भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे. ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथकरणात्मक अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच तो या वृक्षाशी असणारा आपला संबंध छेदू शकतो.

          हा वृक्ष म्हणजे ख-या वृक्षाचे प्रतिबिंब असल्याकारणाने ती एक हुबेहूब प्रतिकृतीच आहे. प्राकृत जे काही आहे ते सर्व आध्यात्मिक जगतातही आहे. निर्विशेषवादी, निराकार ब्रह्मालाच या भौतिक जगतरूपी वृक्षाचे मूळ मानतात आणि सांख्य तत्वज्ञानानुसार मुळापासून प्रकृती आणि पुरुष, त्यानंतर त्रिगुण, पंचमहाभूते आणि दर्शद्रिये, मन इत्यादी निर्माण होतात. या प्रकारे ते संपूर्ण भौतिक जगताचे पृथक्करण चोवीस तत्वांमध्ये करतात. जर ब्रह्म हे संपूर्ण सृष्टीचे केंद्रबिंदू असेल तर त्यापासून प्राकृत जगत हे १८० अंशाचे असते आणि उर्वरित १८० अंशाचे आध्यात्मिक जगत असते. भौतिक जगत एक विकृत प्रतिबिंब आहे म्हणून आध्यात्मिक जगतातही या भौतिक जगताप्रमाणेच वैविध्यता असली पाहिजे आणि ती वास्तविक असली पाहिजे. भगवद्‌गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रकृति ही भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे. आणि पुरुष हे स्वत: भगवंत आहेत. व्यक्त सृष्टी ही भौतिक असल्याकारणाने अनित्य आहे. कोणतेही प्रतिबिंब हे असत्य असते, कारण ते कधी दिसते तर कधी दिसत नाही. परंतु ज्या मूळ स्थानापासून प्रतिबिंब निर्माण झाले आहे ते स्थान शाश्वत आहे. वास्तविक वृक्षाचे हे प्राकृत प्रतिबिंब छेदले पाहिजे. जेव्हा मनुष्याला वेदवता म्हटले जाते तेव्हा असे गृहीत धरण्यात आलेले असते की, या भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे तो जाणतो. जर मनुष्याला आसक्ती भेदण्याची पद्धत माहीत असेल तर तो ख-या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल. जो वैदिक कर्मकांडांकडे आकृष्ट होतो तो या वृक्षाच्या हिरव्यागार पानांमध्ये आकृष्ट झाल्याप्रमाणे आहे. त्याला वेदांचे वास्तविक प्रयोजन ज्ञात नसते. भगवंतांनी स्वत: सांगितल्याप्रमाणे हा प्रतिबिंबित वृक्ष छेदून आध्यात्मिक जगत्रूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणे हैं वेदांचे प्रयोजन आहे.

« Previous Next »