No edit permissions for मराठी

TEXT 2

adhaś cordhvaṁ prasṛtās tasya śākhā
guṇa-pravṛddhā viṣaya-pravālāḥ
adhaś ca mūlāny anusantatāni
karmānubandhīni manuṣya-loke

अध:-खाली; -आणि;ऊध्र्वम्-वर; प्रसृताः-पसरलेल्या; तस्य-त्या वृक्षाच्या; शाखा:- शाखा; गुण-प्राकृतिक गुणांद्वारे; प्रवृद्धाः-वाढलेल्या; विषय-इंद्रिय विषय; प्रवाला:-डहाळ्या; अध:-खाली; -आणि; मूलानि-मुळे; अनुसन्ततानि-पसरलेल्या; कर्म-कर्माला; अनुबन्धीनि-बांधलेल्या; मनुष्य-लोके-मानवसमाजात.

या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियविषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानवसमाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत.

तात्पर्य: वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. या वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आहेत. खालच्या बाजूला मनुष्य, घोडे, गायी, कुत्री, मांजरे इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत. या जीवांच्या अभिव्यक्ती शाखांच्या खालच्या भागाशी आहेत तर वरच्या भागाशी देवता, गंधर्व आणि इतर अनेक उच्च जीवयोनी आहेत. ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते. कधी कधी पाण्याच्या अभावामुळे आपल्याला ओसाड जमीन आढळते तर कधी कधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते, त्याचप्रमाणे विशिष्ट प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात आहेत तेथे त्या प्रमाणात विविध जीवयोनी अभिव्यक्त होतात.

          झाडाच्या डहाळ्यांना इंद्रियविषय मानण्यात आले आहे. प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिये विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रियविषयांचा उपभोग घेतो. शाखांच्या अग्रभागी कान, नाक, डोळे इत्यादी इंद्रिये आहेत आणि ही इंद्रिय विविध इंद्रियविषयांच्या उपभोगाशी संबंधित आहेत. डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, स्पर्श इत्यादी  इंद्रियविषय आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत, जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रियभोगाची उपफले आहेत. पुण्य आणि पापवृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे सर्व दिशेने पसरलेली असतात. प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून तर मानवीय ग्रहमालिकांपासून इतर मुळे विस्तारित होतात. उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध पुण्यकर्मफलांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्चलोकांच्या पुन:प्राप्तीकरिता पूजा, सकाम कर्मे इत्यादी करतो. या मनुष्यलोकाला कार्यक्षेत्र मानले जाते.

« Previous Next »