No edit permissions for मराठी

TEXT 10

utkrāmantaṁ sthitaṁ vāpi
bhuñjānaṁ vā guṇānvitam
vimūḍhā nānupaśyanti
paśyanti jñāna-cakṣuṣaḥ

उत्क्रामन्तम्—शरीराचा त्याग करताना; स्थितम्—शरीरामध्ये स्थित असताना; वा अपि—अथवा; भुज्ञानम्—उपभोग घेताना; वा—अथवा; गुणअन्वितम्—प्राकृतिक गुणाच्या प्रभावाखाली; विमूढाः-मूर्ख व्यक्ती; -कधीही नाही; अनुपश्यन्ति-पाहू शकतात; पश्यन्ति-पाहू शकतात; ज्ञान-चक्षुषः-ज्ञानरूपी नेत्र असलेले.

जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत; परंतु ज्याला ज्ञानचक्षू आहेत तो हे सर्व पाहू शकतो.

तात्पर्य: ज्ञान-चक्षुषः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे, हे सर्व काही ज्ञानावाचून मनुष्य जाणू शकत नाही. आध्यात्मिक गुरूकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो. ज्याला या सर्व गोष्टी यथार्थ रूपामध्ये जाणण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे तो भाग्यवान आहे. प्रत्येक जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या देहाचा त्याग करीत आहे, विशिष्ट स्थितीमध्ये तो राहात आहे आणि प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून उपभोग घेत आहे. परिणामी इंद्रियतृप्तीच्या भ्रमाखाली तो विविध प्रकारची सुख-दुःखे भोगीत आहे. ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूख बनविलेले आहे, ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात. त्यांना या गोष्टींचे मुळीच आकलन होत नाही. तरीही ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते पाहू शकतात की, आत्मा हा देहापासून भिन्न आहे आणि तो देहांतर करीत विविध प्रकारे उपभोग घेत आहे. बद्ध जीव या संसारामध्ये कसे दुःख भोगीत आहेत ते असा ज्ञानी मनुष्य जाणू शकतो. म्हणून ज्यांनी कृष्णभावनेमध्ये अत्यंत उन्नती केली आहे ते या ज्ञानाचा सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, कारण सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते. त्यांनी या बद्धावस्थेतून मुक्त होऊन कृष्णभावनाभावित झाले पाहिजे आणि आध्यात्मिक जगताची प्राप्ती केली पाहिजे.

« Previous Next »