No edit permissions for मराठी

TEXTS 3-4

na rūpam asyeha tathopalabhyate
nānto na cādir na ca sampratiṣṭhā
aśvattham enaṁ su-virūḍha-mūlam
asaṅga-śastreṇa dṛḍhena chittvā

tataḥ padaṁ tat parimārgitavyaṁ
yasmin gatā na nivartanti bhūyaḥ
tam eva cādyaṁ puruṣaṁ prapadye
yataḥ pravṛttiḥ prasṛtā purāṇī

न- नाही; रूपम्-रूप; अस्य-या वृक्षाचे; इह-या जगतामध्ये; तथा-सुद्धा; उपलभ्यते-अनुभवास येऊ शकते; -कधीही नाही; अन्तः-अंत; -कधीही नाही; -सुद्धा; आदि:- आदी; -कधीही नाही; -सुद्धा; सम्प्रतिष्ठा-आधार; अश्वत्थम्-वटवृक्ष; एनम्-हे; सु-विरूढ-अत्यंत दृढपणे; मूलम्-मुळे; असङ्ग-शस्त्रेष्ण-अनासक्तीरूपी शस्त्राने; दृढेन-दृढपणे; छित्त्वा-छेदून; ततः-त्यानंतर; पदम्-स्थिती; तत्-ती; परिमार्गितव्यम्—शोधून काढले पाहिजे; यस्मिन्-जेथे; गताः-जाऊन; -कधीही नाही; निवर्तन्ति-ते परत येतात; भूयः-पुन्हा; तम्--त्याला; एव-निश्चितपणे; -सुद्धा; आद्यम्-आद्य; पुरुषम्-पुरुषोत्तम भगवान; प्रपद्ये-शरण; यतः-ज्यांच्याकडून; प्रवृत्तिः-प्रवृत्ती किंवा प्रारंभ; प्रसृता-विस्तृत; पुराणी-अत्यंत पुरातन.

या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी, अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की, ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परम पुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे.

तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, प्राकृत जगतात या वटवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही. या वृक्षाची मुळे वर असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुस-या टोकाला आहे. वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झाल्याने मनुष्य, वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे हे जाणू शकत नाही किंवा त्या वृक्षाचा आदी कुठे आहे हे देखील जाणू शकत नाही. तरी मनुष्याने वृक्षाचे कारण शोधले पाहिजे. 'मी माझ्या पित्याचा पुत्र आहे, माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत.' अशा रीतीने शोध केल्यावर मनुष्य, गर्भोदकशायी विष्णूंच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांप्रत येऊन पोहोचतो. शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंतांप्रत येऊन पोहोचतो तेव्हा त्याचे शोधकार्य समाप्त होते. भगवत्ज्ञानी व्यक्तींच्या सत्संगाद्वारे मनुष्याने या वृक्षाचे आदी, पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे. हे जाणल्यावर तो, वास्तवतेच्या या मिथ्या प्रतिबिंबापासून हळूहळू अनासक्त होतो आणि ज्ञानाद्वारे वृक्षाशी असणारा संबंध छेदून वास्तविक वृक्षामध्ये स्थित होऊ शकतो.

          या संदर्भातील असङ्ग शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण इंद्रियभोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची आसक्ती फार प्रबळ असते. म्हणून मनुष्याने प्रमाणित शास्त्रांच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाच्या चर्चेद्वारे अनासक्ती शिकली पाहिजे आणि जे वस्तुत: ज्ञानी आहेत त्यांच्याकडून श्रवण केले पाहिजे. भक्तांच्या सत्संगामध्ये याप्रमाणे चर्चा केल्याचे फळ म्हणजे मनुष्य भगवंतांप्रत येऊन पोहोचतो. नंतर मनुष्याने सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे भगवंतांना शरण जाणे होय. ज्या स्थानाची प्राप्ती केली असता या मिथ्या प्रतिबिंबित वृक्षावर पुन्हा कधीही परतावे लागत नाही त्या स्थानाचे भगवान श्रीकृष्ण हे आदिमूळ आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टींचा उद्गम झाला आहे. त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मनुष्याने त्यांना केवळ शरण गेले पाहिजे. हेच श्रवण, कीर्तनादी नवविधा भक्तीचे फळ आहे. या भौतिक जगताच्या विस्ताराचे श्रीकृष्ण हे मूळ कारण आहेत. याबद्दल स्वत: भगवंतांनी सांगितले आहे की, अहम् सर्वांस्य प्रभवः-मीच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे. म्हणून या भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे. त्यांना शरण गेल्यावर आपोआपच तो सांसारिक विस्तारापासून विरक्त होतो.

« Previous Next »