No edit permissions for मराठी

TEXT 6

na tad bhāsayate sūryo
na śaśāṅko na pāvakaḥ
yad gatvā na nivartante
tad dhāma paramaṁ mama

न-नाही; तत्-त्या; भासयते-प्रकाशित करतो; सूर्यः-सूर्य; -नाही; शशाङ्कः-चंद्र; -नाही; पावकः-अग्नी, वीज;यत्-जेथे; गत्वा-गेल्याने; -कधीही नाही; निवर्तन्ते-परतून येतात; तत् धाम-ते धाम; परमम्-परम; मम-माझे,

त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांचे धाम, आध्यात्मिक जगत जे कृष्णलोक, गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. वैकुंठलोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. या सा-या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे. परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्या सर्व ग्रहांच्या देदीप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. वस्तुतः हे देदीप्यमान तेज कृष्णलोक, गोलोक वृंदावनातून प्रसारित होते. या झळझळीत तेजाचा काही भाग महत्तत्व, भौतिक जगताने व्यापलेला आहे. याव्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग, वैकुंठलोक नामक, असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे.

          जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो; परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहात नाही. बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो; परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो व त्या ठिकाणी सचिदानंदमयी जीवनाचा उपभोग घेतो.

          वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. त्याने या सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करवून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगतावर अत्यधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे; परंतु जर त्याने कृष्णभावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो. यासाठी कृष्णभावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्णभावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्य, भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. त्याने भगवद्भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. म्हणून बाराव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत् प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. चौदाव्या अध्यायात सांगण्यात आले आहे की, भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाल्या आहेत.

          या श्लोकातील परम मम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वस्तुत: जगातील प्रत्येक कानाकोपरा सुद्धा भगवंतांच्याच मालकीचा आहे; परंतु आध्यात्मिक जगत हे परमम् अर्थात, षड्रेश्वर्यपूर्ण आहे. कठोपनिषदातही (२.२.१५) सांगण्यात आले आहे की, वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही (न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकम्). कारण संपूर्ण वैकुंठजगत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे. त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही.

« Previous Next »