No edit permissions for मराठी

TEXT 5

nirmāna-mohā jita-saṅga-doṣā
adhyātma-nityā vinivṛtta-kāmāḥ
dvandvair vimuktāḥ sukha-duḥkha-saṁjñair
gacchanty amūḍhāḥ padam avyayaṁ tat

निः-रहित; मान-खोटी प्रतिष्ठा; मोहा:-आणि मोह; जित-जिंकून; सङ्ग-संगाचा; दोषा:- दोष; अध्यात्म-आध्यात्मिक ज्ञानामध्ये; नित्याः-नित्यत्वामध्ये; विनिवृत्त-अलग झालेले; कामाः-कामापासून; द्वन्द्वैः-द्वंद्वापासून; विमुक्ताः-मुक्त झालेला; सुख-दुःख-सुख आणि दुःख; संज्ञैः-नामकः; गच्छन्ति-प्राप्त होतो; अमूढाः-मोहरहित; पदम्-स्थिती; अव्यय-शाश्वतः तत्–त्या,

जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते.

तात्पर्य: शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊनये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे, भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की, प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत. अहंकारापासून उत्पन्न होणा-या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो. या जगामध्ये ज्याला मानसन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही. मोहामुळे अहंकार निर्माण होतो, कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की, आपणच या जगताचे प्रभू आहोत. अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कटीच राहतो. संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे. भूमी ही मानवसमाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे. मनुष्याने, मानवसमाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणा-या कुसंगापासून मुक्त होतो. या कुसंगामुळेच तो या भौतिक जगतात बद्ध होतो. या संगदोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सुख आणि दुःख, आनंद-विषाद इत्यादी सर्व द्वंद्वांतून मुक्त होतो. तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो.

« Previous Next »