No edit permissions for मराठी

TEXT 7

mamaivāṁśo jīva-loke
jīva-bhūtaḥ sanātanaḥ
manaḥ-ṣaṣṭhānīndriyāṇi
prakṛti-sthāni karṣati

मम-माझे; एव-निश्चितपणे; अंशः-अंश; जीव-लोके-बद्ध जगात; जीव-भूतः-बद्ध जीव; सनातनः-सनातन, शाश्वत; मनः-मनासहित; षष्ठानि-सहाः इन्द्रियाणि-इंद्रिये; प्रकृति - भौतिक प्रकृतीमध्ये; स्थानि-स्थित; कर्षति-संघर्ष करीत आहे.

बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत.

तात्पर्य: या शलोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत. असे नाही की, बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो. जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत. या शलोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, सनातन वैदिक प्रमाणांनुसार, भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यांपैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णुतत्व म्हटले जाते, तर दुय्यम किंवा गौण विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, विष्णुतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभित्रांश आहेत. भगवंत स्वत:च्या वैयक्तिक विस्ताराद्वारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णुमूर्ती आणि वैकुंठलोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तीच्या रूपात प्रकट होतात. त्याचे विभित्रांश जीव हे त्यांचे सनातन सेवकच असतात. भगवंतांचे स्वांश अर्थात, त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्याचे विभिन्त्रांश असणा-या जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरूपाने असतात. या गुणांपैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे. प्रत्येक जीवात्म्याला स्वत:चे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. या दोहोंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे. मुतावस्थेमध्ये तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झालेला असतो; बद्ध जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत्सेवेचे विस्मरण झालेले असते. परिणामी, या भौतिक जगतामध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो.

          मांजर-कुत्री, मनुष्य-प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत. या श्लोकातील कषति (संघर्ष करणे) हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. बद्ध जीव हा जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे. जेव्हा त्याचे मन सत्वगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते, रजोगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणामध्ये असते तेव्हा तो शूद्र जीवयोनीत भ्रमण करीत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की, बद्ध जीवावर, मन व इंद्रियांसहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याच वेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ स्वरूपात व्यक्त होतो. माध्यादिनायन श्रुतिमध्ये पुढील माहिती आढळते. स वा एष ब्रह्मनिष्ठ इदं शरीरं मर्त्यमतिसृज्य ब्रह्माभिसम्पद्य ब्रह्मणा पश्यति ब्रह्मणा श्रुणोति ब्रह्मणवेद सर्वमनुभवति। अर्थात, जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठलोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. तो भगवंतांशी प्रत्यक्षपणे बोलू शकतो, ऐकू शकतो आणि त्यांना तत्वतः जाणू शकतो. 'स्मृती'वरूनही असे कळून येते की, वसत्ति यत्र पुरुषा: सर्वे वैकुण्ठ्-मूर्तय:-वैकुंठ लोकामध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य असणा-या जीवांमध्ये आणि विष्णुमूर्तीच्या विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.

          ममैवांश: हे शब्द सुद्धा महत्वपूर्ण आहेत. भगवंतांचे अंश हे काही एखाद्या भौतिक वस्तूच्या तुटून पडलेल्या तुकड्याप्रमाणे नाहीत. आपण यापूर्वीच दुस-या अध्यायात जाणले आहे की, आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत. या अंशाला भौतिकदृष्ट्या जाणता येत नाही. जड पदार्थाचे तुकडे करून ते पुन्हा ज्याप्रमाणे जोडतात त्याप्रमाणे हा अंश नाही. ही संकल्पना या ठिकाणी लागू होत नाही, कारण श्लोकामध्ये सनातनः हा शब्द योजिलेला आहे. हा अंश शाश्वत आहे. दुस-या अध्यायाच्या प्रारंभी असेही सांगण्यात आले आहे की, प्रत्येक देहामध्ये भगवंतांचा अंश उपस्थित आहे (देहिनोऽस्मिन्यथा देहे). जेव्हा हा अंश शारीरिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक विश्वातील एखाद्या वैकुंठ- लोकामध्ये आपले मूळ आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो आणि भगवंतांच्या सान्निध्याचा उपभोग घेतो. तथापि, या श्लोकावरून जाणले पाहिजे की, ज्याप्रमाणे सोन्याचे कण हे देखील सोनेच असते त्याचप्रमाणे जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने गुणात्मकदृष्ट्या भगवंतांसमानच आहेत.

« Previous Next »