No edit permissions for मराठी

TEXT 20

āsurīṁ yonim āpannā
mūḍhā janmani janmani
mām aprāpyaiva kaunteya
tato yānty adhamāṁ gatim

आसुरीम्-आसुरी; योनिम्-योनीः आपन्नाः-प्राप्त करून; मूढाः-मूर्ख; जन्मनि जन्मनि-जन्मजन्मांतरात; माम्-मला; अप्राप्य-प्राप्त न करता; एव-निश्चितपणे; कौन्तेय-हे कौंतेया; ततः-त्यानंतर; यान्ति-जातात; अधमाम्-अधम; गतिम्-गती.

हे कौंतेया! आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत, हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.

तात्पर्य: भगवंत परमकृपाळू आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की, भगवंत असुरांच्या बाबतीत कधीच कृपाळू नसतात. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, आसुरी लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवले जाते आणि भगवंतांची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांचे निरंतर अध:पतन होत जाते. अशा अध:पतनामुळे शेवटी कुत्रा, मांजर, डुक्कर इत्यादी प्रकारची शरीरे प्राप्त होतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवत्कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते. वेदांमध्येही म्हटले आहे की, अशा लोकांचे हळूहळू अध:पतन होते व त्यांना कुत्रा, डुकर इत्यादी योनी प्राप्त होतात. या ठिकाणी कोणी वाद घालू शकेल की, परमेश्वर जर अशा असुरांवर दया करीत नसेल तर मग त्या परमेश्वराला कृपावंत का म्हणावे? या प्रश्नाला उत्तर देताना वेदान्तसूत्रात म्हटले आहे की, भगवंत कोणाचाही द्वेष करीत नाहीत. असुरांना अशा अधम योनीमध्ये ठेवणे हे भगवंतांच्याच कृपेचे दुसरे एक रूप आहे. कधीकधी भगवंत असुरांचा वध करतात; परंतु असा वध करणे हे असुरांच्या चांगल्यासाठीच असते, कारण वेदांमध्ये म्हटले आहे की, भगवंत ज्याचा वध करतात तो मुक्त होतो. इतिहासामध्ये रावण, कंस, हिरण्यकशिपू इत्यादी अशा अनेक असुरांची उदाहरणे आढळतात. या असुरांचा केवळ वध करण्यासाठी भगवंतांनी विविध अवतार धारण केले. म्हणून भगवंतांकडून मारले जाण्याचे भाग्य ज्यांना लाभते त्यांच्यावर भगवंतांची कृपाच होते.

« Previous Next »