TEXT 21
yat tu pratyupakārārthaṁ
phalam uddiśya vā punaḥ
dīyate ca parikliṣṭaṁ
tad dānaṁ rājasaṁ smṛtam
यत्-जे; तु-परंतु: प्रति-उपकार-अर्थम्-प्रत्युपकाराच्या आशेने; फलम्-फळाच्या; उद्दिश्य-उद्देशाने; वा-किंवा; पुन:-पुन्हा; दीयते-दिले जाते; च-सुद्धा; परिक्लिष्टम्-संकुचित भावनेने, तत्—ते, दानम्—दान; राजसम्—राजसिकः स्मृतम्—जाणले जाते.
परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते.
तात्पर्य: दान हे कधी कधी स्वर्गलोकाप्रत उत्रत होण्याकरिता तर कधी कधी महत्प्रयासाने दिले जाते आणि त्याबद्दल 'मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली?' असा पश्चाताप केला जातो. काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते.
ज्या ठिकाणी इंद्रियतृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणा-या अनेक धर्मादाय संस्था आहेत. असे दान वेदसंमत नाही. केवळ सात्विक दानच शास्त्रसंमत आहे.