TEXT 1
arjuna uvāca
sannyāsasya mahā-bāho
tattvam icchāmi veditum
tyāgasya ca hṛṣīkeśa
pṛthak keśi-niṣūdana
अर्जुनः उवाच- अर्जुन म्हणाला; सन्न्यासस्य -संन्यासाचे; महा-बाहो-हे महाबाहो श्रीकृष्ण; तत्त्वम्-तत्व; इच्छामि-इच्छितो; वेदितुम्-जाणणे; त्यागस्य-त्यागाचे; च-सुद्धा; हृषीकेश-हे इंद्रियांचे स्वामी; पृथक्-वेगवेगळे; केशी-निषूदन-हे केशीनिषूदन (केशी दैत्याचा नाश करणारे).
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो हृषीकेश! हे केशीनिसूदन! मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे.
तात्पर्य: भगवद्गीता वास्तविक सतराव्या अध्यायातच समाप्त झाली आहे. हा अठरावा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांचे पुरवणीच्या रूपाने सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी निक्षून सांगितले आहे की, भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचे परमलक्ष्य आहे. हाच मुद्दा या अठराव्या अध्यायात ज्ञानाचा सर्वांत गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आला आहे. पहिल्या सहा अध्यायांत भक्तिमय सेवा (भक्तियोग) यावर जोर दिला आहे: योगिनामपि सर्वेषामू. ‘'सर्व योग्यांमध्ये, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंत:करणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय.' पुढील सहा अध्यायांत शुद्ध भक्तियोग, त्याचे स्वरुप आणि कार्य यांची चर्चा केली आहे. शेवटच्या सहा अध्यायांत ज्ञान, त्याग, अपरा प्रकृती, परा प्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिलेले आहे. याचा निष्कर्ष असा की, सर्व कार्ये करताना भगवंतांची मदत घेतली पाहिजे, जी ॐ तत् सत् या शब्दांनी प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात. भगवद्गीतेच्या तिस-या भागात दाखवून दिले आहे की, जीवनाचे परमलक्ष्य हे भक्तियोगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही. भूतकाळातील आचार्य आणि ब्रह्मसूत्र किंवा वेदान्त सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखविलेली आहे. काही निर्विशेषवादी समजतात की, वेदान्त सूत्रातील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे, परंतु प्रत्यक्षात वेदान्त सूत्रे भक्तियोग समजण्याकरिता आहेत, कारण साक्षात भगवंतच वेदान्तसूत्राचे संकलनकर्ते आणि वेदान्त जाणणारे आहेत. हे पंधराव्या अध्यायात सांगितलेले आहे. प्रत्येक शास्त्र व वेदांचे भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेतही असेच सांगितले आहे.
ज्याप्रमाणे दुस-या अध्यायात संपूर्ण विषयवस्तूचे सार दिले आहे त्याप्रमाणे अठराव्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे. त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. त्याग आणि संन्यास हे दोन वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने या दोन शब्दांचा अर्थ काय असे विचारले.
या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजिलेले हृषीकेश आणि केशिनिषूदन हे दोन शब्द महत्वपूर्ण आहेत. श्रीकृष्णांना हृषीकेश असे म्हणतात, कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की, त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगावे की, जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि शंकांची तुलना नेहमी असुरांबरोबर केली जाते. म्हणून तो श्रीकृष्णांना केशीनिसूदन या नावाने संबोधतो. श्रीकृष्णांनी केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करीत आहे की, श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करतील.