No edit permissions for मराठी

TEXT 17

yasya nāhaṅkṛto bhāvo
buddhir yasya na lipyate
hatvāpi sa imāḻ lokān
na hanti na nibadhyate

यस्य-ज्याला; -नाही; अहङ्कृत:-मिथ्या अहंकाराचे; भावः-स्वभाव: बुद्धिः-बुद्धी; यस्य-ज्याची; -नाही; लिप्यते-आसक्तः; हत्वा-मारून; अपि-सुद्धा; सः-तो; इमान्या; लोकान्-जगतात, -नाही; हन्ति-ठार करती, -नाही, निबध्यते-बंधनात अडकतो.

जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात  नाही.

तात्पर्य: या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारापासून उत्पन्न होत असते. अर्जुन स्वत:ला कर्ता समजत होता आणि त्याने अंतर्बाह्य असणा-या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही. परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळतच नसेल तर मग त्याने कर्म का करावे? परंतु जो कर्माची साधने, स्वत: कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा, यांना जाणतो तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही. मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्णभावनेचा अभाव यांच्यापासून 'मीच कर्ता आहे' व 'मी जबाबदार आहे’ अशा भावनांचा उदय होत असतो. परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्णभावनाभावित कर्म करीत असतो, त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही. जेव्हा सैनिक सेनापतीच्या आज्ञेचे पालन करीत असताना हत्या करतो त्या वेळी त्याला दोषी ठरविले जात नाही. परंतु जर त्या सैनिकाने स्वेच्छेने कोणाला मारले तर मात्र त्याला निश्चितच न्यायालयात शिक्षा ठोठावली जाते.

« Previous Next »