No edit permissions for मराठी

TEXT 46

yataḥ pravṛttir bhūtānāṁ
yena sarvam idaṁ tatam
sva-karmaṇā tam abhyarcya
siddhiṁ vindati mānavaḥ

यतः-ज्यांच्यापासून; प्रवृत्तिः-उद्भव; भूतानाम्-सर्व जीवांचा; येन-ज्याने; सर्वम्-सर्व; इदम्-हे; ततम्-व्यापलेले आहे; स्व-कर्मणा-स्वकर्माद्वारे; तम्-त्याला; अभ्यर्च्य-पूजन करून; सिद्धिम्-सिद्धी; विन्दति—प्राप्त करती, मानवः-मनुष्य.

सर्व जीवांचा उद्‌गम आणि सर्वव्यापी असणा-या भगवंतांची पूजा करून, मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो.

तात्पर्य: पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत. भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान आहेत याला वेदान्त सूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः या शब्दांत पुष्टी देण्यात आली आहे. म्हणून प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आरंभ भगवंत आहेत. सातव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे, भगवंतांनी आपल्या बहिरंगा आणि अंतरंगा या दोन शक्तींद्वारे सर्व काही व्यापले आहे. म्हणून मनुष्याने भगवंतांची त्यांच्या शक्तीसहित पूजा केली पाहिजे. सामान्यत: वैष्णवजन भगवंतांची त्यांच्या अंतरंगा शक्तीसहित पूजा करतात. त्यांची बहिरंगा शक्ती म्हणजे अंतरंगा शक्तीचे विकृत प्रतिबिंब आहे. बहिरंग शक्ती ही पृष्ठभूमी आहे; परंतु भगवंत त्यांच्या परमात्मा या विस्तारित रूपाद्वारे सर्वतः स्थित आहेत. ते सर्व देवतांचे, सर्व मनुष्यांचे, सर्व प्राण्यांचे, सर्वांचेच परमात्मा आहेत. यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की, भगवंतांचा अंश या नात्याने त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. पूर्णतया कृष्णभावनाभावित होऊन भक्तीमध्ये प्रत्येकाने संलग्न झाले पाहिजे. हीच गोष्ट या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे.

प्रत्येकाने जाणले पाहिजे की, इंद्रियांचे स्वामी, हृषीकेश यांनी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कर्मात नियुक्त केले आहे. ज्या कर्मामध्ये मनुष्य नियुक्त झाला आहे त्या कर्माच्या फलाद्वारे त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे. पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन त्याने जर सदैव असा विचार केला तर भगवंतांच्या कृपेने तो सर्व गोष्टी तत्वतः जाणू शकतो. हीच जीवनाची सिद्धी होय. भगवद्गीतेत (१२.७) भगवंत सांगतात की, तेषामहं समुद्धर्ता. भगवंत स्वतः अशा भक्ताचा उद्धार करण्याचे उत्तरदायित्व घेतात. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी होय. मनुष्य कोणतेही कर्म करीत असला तरी तो जर भगवंतांची सेवा करीत असेल तर त्याला निश्चितच परमसिद्धी प्राप्त होईल.

« Previous Next »