TEXTS 51-53
buddhyā viśuddhayā yukto
dhṛtyātmānaṁ niyamya ca
śabdādīn viṣayāṁs tyaktvā
rāga-dveṣau vyudasya ca
vivikta-sevī laghv-āśī
yata-vāk-kāya-mānasaḥ
dhyāna-yoga-paro nityaṁ
vairāgyaṁ samupāśritaḥ
ahaṅkāraṁ balaṁ darpaṁ
kāmaṁ krodhaṁ parigraham
vimucya nirmamaḥ śānto
brahma-bhūyāya kalpate
बुद्धया-बुद्धीने; विशुद्धया-पूर्णपणे विशुद्ध झालेले; युक्त:-युत; धृत्या-निश्चयाने; आत्मानम्-आत्मा किंवा मन; नियम्य-नियमित करून; च-सुद्धा: शब्द-आदीन्-शब्द आदी; विषयान्-इंद्रियविषय; त्यक्त्वा-त्याग करून; राग-आसक्ती; द्वेषौ-आणि द्वेष; व्युदस्य-दूर करून; च-सुद्धा; विवित्त-सेवी-एकांतस्थळी वास करून; लघु-आशी-मित आहार करून; यत-संयमित करून; वाक्-वाणी; काय-शरीर; मानसः-आणि मन; ध्यान-योग-परः— समाधिस्थः नित्यम्-नित्य; वैराग्यम्-वैराग्यः; समुपाश्रितः-आश्रय घेऊन; अहङ्कारम्-मिथ्या अहंकार, बलम्—मिथ्या बल; दर्पम्—गर्व, कामम्—काम; क्रोधम्—क्रोध; परिग्रहम्-आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार; विमुच्य-च्यापासून मुक्त होऊन; निर्ममः-ममत्वाच्या भावनेरहित; शान्तः-शांत; ब्रह्म-भूयाय-आत्मसाक्षात्काराकरिता; कल्पते-योग्य होतो.
आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून, इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून, आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांतस्थळी राहतो, जो मिताआहार करतो, आपली काया, वाचा आणि मन संयमित करती, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो.
तात्पर्य: बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो. याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो. तो इंद्रियविषयांमध्ये आसत नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त असतो. असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणेच एकांतस्थळी वास करण्याला प्राधान्य देतो, आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो. त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नसतो, कारण तो देहात्मबुद्धीतून मुक्त असतो. अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची इच्छा त्याला नसते. त्याच्या ठायी देहात्मबुद्धी नसल्यामुळे तो गर्विष्ठ नसतो. भगवत्कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो आणि इंद्रियतृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही. तसेच तो इंद्रियविषयांच्या प्राप्तीकरिता धडपड करीत नाही. या प्रकारे तो जेव्हा मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा सर्व भौतिक गोष्टींपासून अनासक्त होतो आणि हीच ब्रह्म-साक्षात्काराची अवस्था होय. या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते. देहात्मबुद्धीतून मुक्त झाल्यावर तो शांत होतो आणि कोणत्याही प्रकारे प्रक्षुब्ध होत नाही. याचे वर्णन भगवद्गीतेत (२.७०) करण्यात आले आहे.
आपूर्यमाणमचप्रतिष्ठं समुद्रमाप: प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत् कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी।।
'ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य, समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणा-या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.'