TEXT 61
īśvaraḥ sarva-bhūtānāṁ
hṛd-deśe ’rjuna tiṣṭhati
bhrāmayan sarva-bhūtāni
yantrārūḍhāni māyayā
ईश्वरः—परमेश्वर, सर्व–भूतानाम्—सर्व जीर्वाच्या; हत्–देशे—हृदयामध्ये; अर्जुन—हे अर्जुन;तिष्ठति-वास करतो; भ्रामयन्-भ्रमण करविणारा; सर्व-भूतानि-सर्व जीव;यन्त्र-एखाद्या यंत्रावर; आरूढानि-बसविल्याप्रमाणे; मायया-मायेच्या प्रभावाखाली.
हे अर्जुन! परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत.
तात्पर्य: अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेकबुद्धी पुरेशी नव्हती. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की, जीव हा सर्वेसर्वा नसतो. भगवान श्रीकृष्ण स्वत: अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवांच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते; परंतु त्रिकालज्ञ परमात्मा जीवांच्या सर्व कर्मांचा साक्षी असतो. म्हणून जीवांची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या त्या गोष्टींची प्राप्ती होते आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्राकृत शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवांची सर्व कार्ये घडतात. ज्याक्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते तत्क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. जीव अर्ड़त, चालक जरी एकच असला तरी द्रुतगतीने धावणा-या मोटारगाडीत बसलेला मनुष्य मंदगतीने धावणा-या मोटारगाडीत बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकतो. त्याप्रमाणे परमात्म्याच्या योजनेनुसार भौतिक प्रकृती ही विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना करते, जेणेकरून तो जीव आपल्या पूर्वइच्छांनुसार कार्य करू शकेल. जीव हा स्वतंत्र नसतो. आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत. असा विचार मनुष्याने करू नये. जीव हे सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतात. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवांचे कर्तव्य आहे आणि हाच आदेश पुढील श्लोकामध्ये देण्यात आला आहे.