TEXT 72
kaccid etac chrutaṁ pārtha
tvayaikāgreṇa cetasā
kaccid ajñāna-sammohaḥ
praṇaṣṭas te dhanañ-jaya
कचित्-काय; एतत्-हे; श्रुतम्-श्रवण केले; पार्थ-हे पृथापुत्र; त्वया-तू; एक-अग्रेणएकाग्रतेने; चेतसा-मनाने; कच्चित्-काय; अज्ञान-अज्ञान; सम्मोहः-मोह; प्रणष्टः-नष्ट झाला; ते-तुझा; धनञ्जय-हे धनंजय, संपत्तीवर विजय मिळविणारा.
हे पार्थ! हे धनंजय! तू हे एकाग्रचित्ताने श्रवण केलेस का? आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का?
तात्पर्य: भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरू या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्यच होते आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्दयाचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. वास्तविकपणे जो कोणी श्रीकृष्णांसारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूद्वारे अथवा त्यांच्या प्रतिनिधींद्वारे भगवद्गीता श्रवण करतो त्याला आपल्यामधील सर्व अज्ञान नष्ट झाल्याचे दिसून येईल. भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेले सामान्य पुस्तक नाही, स्वत: पुरुषोत्तम श्रीभगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्याइतपत भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकाररूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते.