No edit permissions for मराठी

TEXT 75

vyāsa-prasādāc chrutavān
etad guhyam ahaṁ param
yogaṁ yogeśvarāt kṛṣṇāt
sākṣāt kathayataḥ svayam

व्यास-प्रसादात्-व्यासदेवांच्या कृपेने; श्रुतवान्-मी ऐकले; एतत्-हे; गुह्यम्-गुह्य; अहम्मी; परम्—सर्वश्रेष्ठ किंवा परम; योगम्—योग; योग-ईश्वरात्—योगेश्वराकड्न; कृष्णात्— श्रीकृष्णांकडून; साक्षात्-साक्षात; कथयतः-सांगत असता; स्वयम्-स्वतः .

व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

तात्पर्य: व्यासदेव हे संजयाचे आध्यात्मिक गुरू होते आणि संजय मान्य करतो की, व्यासकृपेद्वारेच तो भगवंतांना जाणू शकला. याचाच अर्थ असा आहे की, मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे. आध्यात्मिक गुरू हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे आहे आणि या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते. हेच गुरुशिष्य परंपरेचे रहस्य आहे. जेव्हा आध्यात्मिक गुरू हा अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणेच मनुष्य भगवद्‌गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो. संपूर्ण भूतलावर अनेक योगी आहेत; परंतु श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. भगवंतांना शरण जाणे हा त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तोच सर्वोत्तम योगी होय. या विधानाची पुष्टी सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. योगिनाम्‌ अपि सर्वेषाम्‌.

          नारद मुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आणि व्यासदेवांचे गुरू आहेत. म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेवही तितकेच प्रमाणित आहेत. संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे. यास्तव व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयाच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला. जो साक्षात श्रीकृष्णांकडून श्रवण करतो तो हे गुह्य ज्ञान जाणू शकतो. जर मनुष्य अशा गुरुशिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णांद्वारे श्रवण करू शकत नाही. त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते.

          भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या सर्व प्रकारच्या योगपद्धतींचे वर्णन  करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे या सर्व प्रकारच्या योगपद्धतींचे स्वामी आहेत. तथापि, हे जाणले पाहिजे की, ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्याइतपत अर्जुन भाग्यवान होता त्याप्रमाणे व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयही श्रीकृष्णांकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू शकला. वस्तुतः श्रीकृष्णांपासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवांसारख्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यांत मुळीच भेद नाही. आध्यात्मिक गुरू हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो. म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरूच्या जन्मतिथीला त्यांचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात.

« Previous Next »