No edit permissions for मराठी

TEXT 22

vāsāṁsi jīrṇāni yathā vihāya
navāni gṛhṇāti naro ’parāṇi
tathā śarīrāṇi vihāya jīrṇāny
anyāni saṁyāti navāni dehī

वासंसि-वस्त्रे; जीर्णानि-जुनी आणि झिजून गेलेली; यथा- ज्याप्रमाणे; विहाय-टाकून; नवानि-नवी वस्त्रे; गृह्णाति-ग्रहण करतो; नर:- मनुष्य; अपराणि-दुसरी; तथा- त्याप्रमाणे; शरीरणि-शरीरे; विहाय-टाकून; जीर्णानि-जुनी आणि निरुपयोगी झालेली; अन्यानि- निराळी; संयति-खचित धारण करतो; नवानि-नवी; देही - देहधारी जीवात्मा.

ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करूच नवीन भौतिक शरीर धारण करतो.

तात्पर्य : अणुरुप आत्म्यांकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याचा अस्तित्वावर विश्‍वास नाही तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही, पण अशा वैज्ञानिकांनासुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमार्यवस्था आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्‍लोकामध्ये (2.13) करण्यात आले आहे.

     अणुरुप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो त्याचप्रमाणे परमात्माही अणुरुप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुण्डकोपनिषद तसेच श्‍वेताश्वतरोपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्षी (अणुरुप जीवात्मा) वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी (श्रीकृष्ण) आपल्या मित्राकडे केवळ पहात आहे. गुणात्मकदृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एकजण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे व्सिमरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररुपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला त्याप्रमाणे ज्याक्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्ष्याचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुण्डकोपनिषद (3.1.2) आणि श्‍वेताश्वतरोपनिषद (4.7) दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात.

समाने वृक्षे पुरुषो निमग्नोऽनीशया शोचति मुह्यमान:।
जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोक:॥

     ‘‘जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे, म्हणजेच भगवंतांकडे तो ज्याक्षणी पाहतो आणि त्यांची महानता जाणतो तत्क्षणी तो दु:खग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतांतून मुक्त होतो.’’ अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजेच श्रीकृष्णांकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परम लीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो.

     या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की, त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देह -स्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगांतून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते.

« Previous Next »