No edit permissions for मराठी

TEXT 21

vedāvināśinaṁ nityaṁ
ya enam ajam avyayam
kathaṁ sa puruṣaḥ pārtha
kaṁ ghātayati hanti kam

वेद -जो जाणतो; अविनाशनिम् -अविनाशी; नित्यम् -नित्य अस्तित्वात असणारा; :-जो कोणी; एनम् - हा (आत्मा); अजम्- जन्मरहित; अव्ययम्- निर्विकार किंवा क्षयरहित; कथम् - कसा; स:- तो; पुरुष:- पुरुष; पार्थ - हे पार्थ; कम्-कोणाला; घातयति-मारवितो; हन्ति-मारतो; कम्-कोणाला.

हे पार्थ! जो व्यक्ती जाणतो की, आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील?

तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वत:ची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला, न्यायाधीशाने मृत्युदंडांची शिक्षा फर्माविली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसार दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फर्मावितो. खुनी व्यक्तीला देहान्ताची सजा देण्यात यावी याची पुष्टी ‘मनु-संहितेत’ करण्यात आली आहे. कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुत: हितकारक आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की, या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रीत्यर्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच. कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात, त्याचा आत्मा मारला जात नाही, हे अर्जुनाने योग्य रितीने जाणले पहिजे. म्हणून न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

« Previous Next »