No edit permissions for मराठी

TEXT 26

atha cainaṁ nitya-jātaṁ
nityaṁ vā manyase mṛtam
tathāpi tvaṁ mahā-bāho
nainaṁ śocitum arhasi

अथ - जर, तथापि; च-सुद्धा; एनम् - हा आत्मा; नित्य -जातम्- नित्य जन्माणारा; नित्यम्- नेहमी; वा- किंवा; मन्यसे- तुला असे वाटते; मृतम् - मृत झालेला; तथा अपि- तरीही; त्वम्- तू; महा-बाहो-हे महाशक्तिशाली; - कधीच नाही; एनम्- आत्म्याविषयी; शोचितुम् - शोक करणे; अर्हसि-योग्य आहे.

तथापि, जरी तुला वाटते की, आत्मा (किंवा जीवनाची लक्षणे) हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो! तू शोक करणे योग्य नाही.

तात्पर्य: बौद्धांप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्‍वासच ठेवत नाही. असे दिसून येते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होत आणि ते लोकायतिक व वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्त्यांचे प्रतिपादन आहे की, भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात. त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वांच संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात. मानुष्यकशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सद्यस्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत. असे हे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरही आधारित आहेत.

     वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्‍वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनांचा ठरावीक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवीत नाही. उलटपक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालविली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबरच तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अणुरुप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्‍वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे, ज्याअर्थी प्रत्येक क्षणी जडद्रव्यांपासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत त्याअर्थी अशा घटनांबद्दल दु:खी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्मच नसता तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकांपासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. क्षत्रिय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणेच त्याला योग्य होते.

« Previous Next »