TEXT 3
klaibyaṁ mā sma gamaḥ pārtha
naitat tvayy upapadyate
kṣudraṁ hṛdaya-daurbalyaṁ
tyaktvottiṣṭha paran-tapa
क्लैब्यम् -नपुंकत्व; मा स्म - नको ; गम:- प्राप्त होऊ ; पार्थ - हे पार्थ (पृथापुत्र); न - कधीही नाही; एतत् - या; त्वयि - तुझ्या ठिकाणी; उपपद्यते- शोभनीय; योग्य; क्षुद्रम- क्षुद्र; हृदय-हृदयाचे; दौर्बल्यम् - दौबर्ल्य, कमकुवतपणा; त्यक्त्वा- सोडून; उत्तिष्ठ - ऊठ; परन्तप-हे परंतप (शत्रूला त्रस्त करणारा).
हे पार्थ! अशी हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंत:करणाचे असे क्षुद्र दुबळेपणा सोडून दे आणि परंतप !ऊठ.
तात्पर्य: अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मणपुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रियपूत्र होऊ नये, अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तीकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणातात की, अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदचित करील, पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदर्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनसारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे.