TEXT 30
dehī nityam avadhyo ’yaṁ
dehe sarvasya bhārata
tasmāt sarvāṇi bhūtāni
na tvaṁ śocitum arhasi
देही - भौतिक शरीरचा स्वामी; नित्यम्- शाश्वत काळासाठी; अवध्य:- वध होऊ शकत नाही; अयम् - हा आत्मा; देहे - शरीरामध्ये ; सर्वस्य - प्रत्येकांच्या; भारत - हे भरतवंशजा; तस्मात् - म्हणून; सर्वाणि - सर्व; भूतानि - प्राणिमात्र; न-कधीच नाही; त्वम्- तू; शोचितुम् - शोक करणे; अर्हसि- योग्य आहे.
हे भरतवंशजा! या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणिमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही.
तात्पर्य : भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की, आतमा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध -कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की, भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की, आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. पण त्याचबरोबर युद्ध -काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिसेंची गरज लहरीखातर न ठरविता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे.