TEXTS 42-43
yām imāṁ puṣpitāṁ vācaṁ
pravadanty avipaścitaḥ
veda-vāda-ratāḥ pārtha
nānyad astīti vādinaḥ
kāmātmānaḥ svarga-parā
janma-karma-phala-pradām
kriyā-viśeṣa-bahulāṁ
bhogaiśvarya-gatiṁ prati
याम् इमाम् - हे सर्व; पुष्पिताम् - दिखाऊ, अलंकारिक; वाचम्- शब्द; प्रवदन्ति-बोलतात; अविपश्चित:-अल्पज्ञ लोक; वेद-वाद-रता:- वेदांचे तथाकथित अनुयायी; पार्थ-हे पृथापुत्र; न-कधीच नाही; अन्यत् - अन्य काही; अस्ति-आहे; इति-याप्रमाणे; वादिन:-समर्थन करणारे किंवा म्हणणारे; काम-आत्मान:- इंद्रियतृप्तीची इच्छा करणारे; स्वर्ग-परा:- स्वर्गप्राप्ती हेच ध्येय मानणारे; जन्म-कर्म-फल-प्रदाम् - सकाम कर्म, चांगला जन्म इत्यादी फळे देणारे; क्रिया-विशेष- थाटामाटाचे विधी; बहुलाम् - विविध; भोग- इंद्रियभोग; ऐश्वर्य- आणि ऐश्वर्य किंवा संपत्ती; गतिम्-प्रगती; प्रति-त्याकडे
अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की, याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही.
तात्पर्य : सामान्यत: लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कार्मांवर अत्यंत आसक्त असतात. स्वर्गलोकांमध्ये इंद्रियतृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषत: ज्योतिष्टोम यज्ञ सांगण्यात आले आहेत. जो स्वर्गलोकांची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे. जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की, वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अननुभवी लोकानां दृढ कृष्णभावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रियभोगामुळे आकर्षिले जातात.
वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम सोममृता अभूम आणि अक्षय्यं हे वै चातुर्मास्ययाजिन: सुकृतं भवति. जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमपरसपान करण्यास पात्र ठरतात. यापृथ्वीवरही काहीजण सोमरस पान करून धष्टपुष्ट आणि इंद्रियतृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधींमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यत: ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोगाव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की, स्वर्गामध्ये ‘नन्दन-कानन’ नावाची उद्याने आहेत, जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रियलोलुप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तेथे असतात.