No edit permissions for मराठी

TEXT 70

āpūryamāṇam acala-pratiṣṭhaṁ
samudram āpaḥ praviśanti yadvat
tadvat kāmā yaṁ praviśanti sarve
sa śāntim āpnoti na kāma-kāmī

आपूर्यमाणम्-नेहमी भरलेला; अचल-प्रतिष्ठम् -दृढपणे स्थिर किंवा अचल असणारा; समुद्रम्-समुद्र; आप:- पाणी; प्रविशन्ति- प्रवेश करते; यद्वत्- ज्याप्रमाणे ; तद्वत्- त्याप्रमाणे; कामा:- इच्छा; यम्-ज्याच्यामध्ये; प्रविशन्ति- प्रवेश करते; सर्वे-सर्व; स:- तो मनुष्य; शान्तिम्- शांती; आप्नोति-प्राप्त करतो; -नाही; काम-कामी-जो इच्छापूर्तीची कामना करतो.

ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य, समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारुपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्ती करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.

तात्पर्य : विशाल समुद्र जरी नेहमी भरलेला असला तरीही विशेषत: पावसाळ्यात तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो. तरीही समुद्र तसाच, शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्णभावनेत स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रियतृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरीसुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्णभावनाभावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवितात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वत:मध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील,पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रियतृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्णभावनाभावित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रियतृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्येच तृप्त असल्याकारणाने नेहमी समुद्राप्रमाणेच स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते ते कधीच शंाती प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्षू सकाम कर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत; परंतु कृष्णभावनाभावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्षप्राप्त करण्याचीही त्याला इच्छा नसते. कृष्णभक्तांना भौतिक इच्छा नसतात म्हणून ते पूर्णपणे शांत असतात.

« Previous Next »