No edit permissions for मराठी

TEXT 69

yā niśā sarva-bhūtānāṁ
tasyāṁ jāgarti saṁyamī
yasyāṁ jāgrati bhūtāni
sā niśā paśyato muneḥ

या-जी; निशा - रात्र असते; सर्व -सर्व; भूतानाम् -जीवांची; तस्याम् -त्यामध्ये; जागर्ति-जागृत असतो; संयमी-आत्मसंयमी व्यक्ती; यस्याम्-ज्यामध्ये; जाग्रति- जागृत असतात; भूतानि- सर्व प्राणी, जीव; सा-ती असते; निशा-रात्र; पश्यत:- आत्मनिरीक्षण करणाऱ्यासाठी; मुने:- मुनी.

सर्व जीवांची जी रात्र असते, ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते.

तात्पर्य : बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रियतृप्तीकरिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो. आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागूत असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. याउलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रियसुखाची स्वप्ने पाहात असतो. आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दु:ख वाटत असते. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दु:खाच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो.

« Previous Next »