No edit permissions for मराठी

TEXT 24

utsīdeyur ime lokā
na kuryāṁ karma ced aham
saṅkarasya ca kartā syām
upahanyām imāḥ prajāḥ

उत्सीदेयु:-नष्ट होतील; इमे-हे सर्व; लोका:- लोक, जग; -नाही; कुर्याम्-आचरण केले; कर्म-नियम कर्मे; चेत्-जर; अहम्-मी; सङ्करस्य-अनावश्यक प्रजा; -आणि; कर्ता-उत्पन्न करणारा; स्याम्-होईन; उपहन्याम्-विनाश करणारा; इमा:- या सर्व; प्रजा:- जीव.

मी जर नियम कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन.

तात्पर्य: वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरिता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात.कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्याची जबाबदारी भगवंतांकडे जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्त्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वत: भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की, जरी आपल्याला भगवंतांच्या पदचिह्नांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे; पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रमद्भागवत (10.33.30-31) सांगते की,

नैतत्समाचरेज्जातु मनसापि ह्यनीश्वर:।
विनश्यत्याचरन् मौढ्याद्यथारुद्रोऽब्धिजं विषम् ॥

ईश्वराणां वच: सत्यं तथैवाचरितं क्वचित्।
तेषां यत् स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत् समाचरेत् ॥

     ‘‘मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक (अधिकृत) सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील. तथापि, मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये.’’

     ईश्‍वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र-सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्‍वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागराइतके विष प्राशन केले,पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक भोंदू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की, अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्याच तोंडात जात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही भोंदू भक्त आहेत, जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेमनृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात; परंतु ते लोक विसरतात की, गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित ‘अवतार’ आढळून येतात.

« Previous Next »