TEXT 27
prakṛteḥ kriyamāṇāni
guṇaiḥ karmāṇi sarvaśaḥ
ahaṅkāra-vimūḍhātmā
kartāham iti manyate
प्रकृते:- प्रकृतीच्या; क्रिमाणनि-केली जाणारी ; गुणै:- गुणांद्वारे; कर्माणि-कर्मे; सर्वश:-सर्व प्रकारच्या; अहङ्कार-विमूढ-मिथ्या अहंकाराने मोहित झालेला; आत्मा-आत्मा; कर्ता-कर्ता; अहम्-मी; इति-असे; मन्यते-मानतो.
मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वत:लाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात.
तात्पर्य: एकाच पातळीवर कार्य करणारे, एक कृष्णभावाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात; परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा, मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असातो की, आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की, शीरराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो, याचेदेखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वत:कडे घेत असतो आणि हेच त्याया अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की, हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्ये करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानिसक कार्ये कृष्णभावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की, पुरुषोत्तम श्रीभगवान हे हृषीकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रियतृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते.