TEXT 43
evaṁ buddheḥ paraṁ buddhvā
saṁstabhyātmānam ātmanā
jahi śatruṁ mahā-bāho
kāma-rūpaṁ durāsadam
एवम्-याप्रमाणे; बुद्धे:- बुद्धीहून; परम्-श्रेष्ठ; बुद्ध्वा-जाणून; संस्तभ्य-स्थिर करून; आत्मानम्-मन; आत्मना- विचारपूर्वक बुद्धीद्वारे; जहि-विजय प्राप्त कर; शत्रुम्-शत्रू; महाबाहो-हे महाबाहू; काम-रुपम्-कामरुपामधील; दुरासदम्-दुष्कर.
याप्रमाणे आपण स्वत: भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन! मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे (कृष्णभावना) मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरुपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे.
तात्पर्य: श्रीमद्भगवद्गीतेचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्णभावनेकडे निर्देश देताना सांगतो की, मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंतांचा शाश्वत सेवकरुपी स्वत:चे स्वरुप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्णभावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्मांचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यांपासून प्रभावित न होता स्वत:च्या विशुद्ध स्वरुपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे, क्रमश: कृष्णभावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योगसाधनांच्या सहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनप्राप्तीमध्ये साहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्णभावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.
या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘कर्मयोग’ या तिसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.