No edit permissions for मराठी

TEXT 42

indriyāṇi parāṇy āhur
indriyebhyaḥ paraṁ manaḥ
manasas tu parā buddhir
yo buddheḥ paratas tu saḥ

इन्द्रियाणि -इंद्रिये; पराणि-श्रेष्ठ; आहु:-म्हटली जातात; इन्द्रियेभ्य:- इंद्रियांहून अधिक; परम्-श्रेष्ठ; मन:- मन; मनस:- मनाहून अधिक; तु-सुद्धा; परा-श्रेष्ठ; बुद्धि:- बुद्धी; य:- जो; बुद्धे:- बुद्धीहून अधिक; परत:- श्रेष्ठ; तु-पण; स:- तो.

कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीमध्ये श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो (आत्मा) बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे.

तात्पर्य: कामाच्या कार्यांची इंद्रिये ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते; पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियद्वारामध्ये परमभावना किंवा कृष्णभावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्णभावनेमध्ये आत्मा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्ये होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे होय, परंतु मन हे सक्रिय असल्याकारणाने जरी शरीर निश्‍चल आणि विश्रांती घेत असले तरी, मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते, त्याचप्रमाणे क्रियाशील असते. परंतु मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतांमध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्त्वे उदाहरणार्थ, बुद्धी, मन आणि इंद्रिये ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे, की इंद्रियभोगाचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रियाविषयांपेक्षा श्रेष्ठ आहे, परमदृष्ट्वा निवर्तते- जर मनाला भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तींमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदात  आत्म्याचे वर्णन महान किंवा मोठा असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रियविषय, इंद्रिये, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरुपस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्‍नांचे समाधान होते.

     बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरुपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्णभावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो.आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रियविषयांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करू मन बळकट केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन, बुद्धीद्वारे आपले मन कृष्णभावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच मन बळकट बनते. मग इंद्रिये जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. परंतु जरी आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्णभावनेत श्रीकृष्णांच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना असते.

« Previous Next »