No edit permissions for मराठी

TEXT 12

kāṅkṣantaḥ karmaṇāṁ siddhiṁ
yajanta iha devatāḥ
kṣipraṁ hi mānuṣe loke
siddhir bhavati karma-jā

काङ्क्षन्त:- इच्छा करणारे; कर्मणाम् -सकाम कर्माचं; सिद्धिम् - सिद्धी किंवा परिपूर्णत:; यजन्ते- ते यज्ञाद्वारे पूजा करतात; इह-या भौतिक जगतात; देवता:- देवतांची; क्षिप्रम्-त्वरित; हि-निश्‍चितच; मानुषे - मानव समाजात; लोके-या जगात; सिद्धि:- यश; भवति- प्राप्त होते; कर्म-जा- सकाम कर्मापासून.

मनुष्य या जगात सकाम कार्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात, मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते.

तात्पर्य: या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रुपे समजतात. वास्तविकपणे देवता या भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत, वेद सांगतात की नित्यो नित्यानाम्- भगवंत एकच आहेत. ईश्वर: परम: कृष्ण:- श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव (नित्यानाम्) आहेत. देवता कधीही नारायण, श्रीविष्णू किंवा  श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही. वस्तुत: ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात. (शिवविरिञ्चिनुतम). तरीही आश्‍चर्याची गोष्ट आहे की, परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे. (anthropomorphism) किंवा परमेश्वर पशुरुपधारी (zoomorphism) आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. इह देवता: हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवितो. पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीविष्णू हे या भौतिक  जगातील नाहीत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यही सांगतात की, नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत की, अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्णभावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगुर फलासाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल. देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देवदेवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबडे आहेत. तरी या जगामध्ये मानवसमाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगुर भौतिक ऐश्वर्यप्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळाले तर त्याला वाटते की, आपण मोठे वरदान प्राप्त केले आहे. म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्यापुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवितात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्णभावनाभावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळविण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्‍लोक दर्शवितो की, लोकांना क्वचितच कृष्णभावनेमध्ये आस्था असते. बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्ये रूची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात.

« Previous Next »