TEXT 19
yasya sarve samārambhāḥ
kāma-saṅkalpa-varjitāḥ
jñānāgni-dagdha-karmāṇaṁ
tam āhuḥ paṇḍitaṁ budhāḥ
यस्य-ज्याचे; सर्वे-सर्व प्रकारचे; समारम्भा:-प्रयत्न; काम-इंद्रियतृप्तीच्या इच्छेवर आधारित; सङ्कल्प-निश्चय; वर्जिता:- रहित आहेत; ज्ञान-पूर्ण ज्ञानाच्या; अग्नि-अग्नीद्वारे; दग्ध-जाळून गेलेले किंवा दग्ध; कर्माणम्-ज्याचे कर्म; तम्-त्याला; आहु:- म्हणतात; पण्डितम्-पंडित; बुधा:- ज्ञानीजन.
ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधुपुरुषांच्या मते, या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल, अग्निरुपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे.
तात्पर्य: केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्णभावनाभावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्णभावनाभावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रियतृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे, असे जाणले पाहिजे की, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, या आपल्या स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफल जाळून भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. भगवंतांच्या या सेवारुपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीबरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो.